Bookstruck

गीता हृदय 46

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

निर्भय वृत्तीनें पुढे झाल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकला होणार नाही. जवाहरलाल एकदां म्हणाले “निर्भयपणें विचार करा. निर्भयपणें आचार करा.” लोकमान्य उभे राहिले व म्हणाले “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळवणारच.” आगरकर उभे राहिले व म्हणाले” दुष्ट रूढी तोडल्या पाहिजेत. स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे.” आगरकरांचा छळ झाला. त्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली गेली ! परंतु आगरकर खचले नाहीत. ते वीराप्रमाणें उभें राहिले. त्यांच्या विचारांचा आज विजय झाला आहे. आज महात्माजी निर्भयपणें उभे ठाकले आहेत. असे हे निर्भय पुरुष उभे राहतात व जगाला पुढें नेतात. जग आधी तयार होत नाही. परंतु या ध्येयवादी व्यक्तींचा त्याग पाहून, त्यांची अचल निष्ठा पाहून जग शेवटी त्याच्या पाठोपाठ जातें. जगाचें पाऊल पुढें पडतें.

जगांत एकीकडे अहंकारी लोक आहेत. हें मिळवीन; याला लुटीन, त्याला पिटीन; येथें साम्राज्य स्थापीन, त्या देशाला गुलाम करीन; आम्ही उच्च संस्कृतीचे, बाकीचे तुच्छ; मी स्पृश्य, ते दुसरे अस्पृश्य; अशा प्रकारचा राक्षसी अहंकार एकीकडे थैमान घालीत असतो. या राक्षसाशी दोन हात करायला सत्प्रवत्त लोक उभे राहतात. महात्माजींना एकाने प्रश्न विचारला “जगण्यांत तुम्हांला आनंद कां वाटतो?” त्यांनी उत्तर दिलें “जगांतील अंधार दूर करण्यासाठी धडपडण्यांत मला आनंद वाटतो.”

जगांत काहींची चैन चालली आहे. कोट्यावधि लोकांची दैना आहे. ही विषमता पाहून जो उठणार नाही, ती दूर व्हावी म्हणून बंड पुकारणार नाही, तो राक्षस आहे. स्वत:जवळच राखतो तो राक्षस. दुस-यास देतो तो देव. कोकणांत खोत व शेतकरी यांचे झगडे आहेत. खोताला नाना अधिकार. आधी खोताचें गवत कापून दिलें पाहिजे. आधी खोताचे हरडे गोळा झाले पाहिजेत. सारे जंगल खोताचे. तिकडे जमीनदारांचे असेच शेकडों मिराशी अधिकार. यत्किंतिचहि श्रम न करतां गाद्यावंर श्रम न करतां गाद्यांवर लोळणारी ही ऐतखाऊ बांडगुळे पाहून कोणाचें रक्त सळसळणार नाही ? शेतकरी राबराब राबतो. परंतु त्यांच्या मुलांच्या अंगावर नीट कपडा नाही. बायकोला नीट लुगडें नाही. घरांत उपासमार. ना ज्ञान, ना कला. दरिद्र नारायणाचा हा फाटका संसार कोण सुधारणार ? गिरणीचे मालक, कारखानदार बंगल्यांतून रहात आहेत. मोटारी उडवीत आहेत. परंतु कामगारांची किती हीन दीन स्थिति ! रहायला रद्दी जागा. पोटभर खायला नाही. जीवनात आनंद नाही. हे कोठवर सहन करावयाचें ?


समाजवादाशिवाय आता तरणोपाय नाही. समाजवादाचें नाव ऐकून घाबरण्याचें कारण नाही.  समाजवाद म्हणजे कृतीत आणलेलें अद्वैत; समाजवाद म्हणजे जीवनांत उतरलेला वेदान्त. गांधीवाद व समाजवाद यांचा समन्वय करतां आला तर करा. अहिंसेने समाजवाद आला तर तो महात्माजींना नको आहे असें नाही. स्वर्गीय महादेवभाईंनी एकदां लिहिले होते कीं “निवडणुकीच्या कार्यक्रमांत समाजवादी योजना आंखून लोकांनी जर तुम्हांला निवडून दिलें तर ती योजना असेंब्लींत तुम्ही पास करायला हरकत नाही.”

« PreviousChapter ListNext »