Bookstruck

मानवजातीचें बाल्य 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

युध्द पुकारणार्‍या राष्ट्रांना एक प्रकारचें आंधळेंपण येत असतें.  जेरिमियानें स्वत:ची दृष्टि निर्भळ ठेविली होती, डोकें शाबूत ठेवलें होतें.  लोकांनीं जेरिमियाला पकडलें.  चौकशीचा देखावाहि न करतां राजवाड्याखालच्या एका अंधार्‍या व दुर्गंधीमय अशा नरककुंडांत त्यांनी त्याला टाकलें.

इकडे अद्याप वेढा होता.  आणि तिकडे त्या नरकांत जेरिमिया खितपत पडला होता.  शेवटीं गुप्तपणें राजानें त्याला बोलावलें.  राजा भ्याड होता.  परंतु त्या निर्भय व उदार महात्म्याविषयीं त्याला मनांतल्या मनांत आदर वाटे.  जेरिमिया आपले विचार बदलावयास तयार नव्हता.  सुटकेसाठीं स्वत:च्या आत्म्याशीं प्रतारणा करावयास तो तयार नव्हता.  तो राजाला एवढेंच म्हणाला, ''या नरककुंडांतून काढून मला तुरुंगांत ठेवा.  मानवी प्राण्याला सडून मरायला या स्थानापेक्षां तुरुंग बरा.''

राजानें ऐकलें आणि राजवाड्यांतच एके ठिकाणीं त्याला स्थानबध्द करण्यांत आले.  पुन्हा पुन्हा तो झेडेकाला सांगत होता, कीं बाबिलोनच्या राजाला शरण जा.  परंतु कोणी ऐकेना.  त्या मूर्ख व हट्टी राजाचा अभिमान पार वाहून जाईल इतकें रक्त अद्याप सांडलें नव्हतें.

तेबुचदनेझ्झरानें शहराभोंवतालचे पाश अधिकच आवळले.  शहरांतील लोकांस काय करावें समजेना.  आपला दुबळा राग कोणावर तरी काढावा असें त्यांना वाटूं लागलें.  त्यांना जेरिमियाच्या रक्ताची तहान होती.  त्याच्या प्राणांवर ते उठले.  स्वत:च्या हालअपेष्टांनीं आंधळे होऊन, जो एक पुरुष त्यांना या हालअपेष्टांपासून वांचवूं पहात होता त्याच्यावरच ते उठले.  लोकांनी राजाला घेरलें. ''जेरिमियाला पकडून चिखलाच्या खळग्यांत टाका'' असें ते म्हणाले.  चिखलाच्या एका खोल खळग्यांत त्याला टाकण्यांत आले.  तो जसजसा धडपडे तसतसा तो आणखी आणखी खालीं जाई.  त्याचे पाय वर निघतना.  जेरिमिया चिखलांत बुडणार, गुदमरून मरणार !

सुदैवानें एका नीग्रो गुलामाला दया आली.  त्यानें जेरिमियाला चिखलांतून दोरीनें ओढून वर घेतलें आणि वेळींच त्याचे प्राण वांचविले.

जेरिमिया कोठें पळून गेला नाहीं.  स्वत:चें जीवितकार्य त्याच्यासमोर होतें.  तो पुन्हा राजाकडे गेला.  ही शेवटची वेळ होती.  शत्रूजवळ, 'ताबडतोब तह करा' असें पदर पसरून त्यानें मागणें मागितलें.  परंतु झेडेकानें त्याला पुन्हा दूर घालविलें, आणि वेढा चालूच राहिला.
पुढें अठरा महिन्यांनीं शहर घेतलें गेलें.  ज्यू राजाचे मुलगें ठार मारण्यांत आले.  पित्याच्या डोळ्यांदेखत पुत्रांचे वध झाले.  नंतर झेडेकाचे डोळे काढ्यांत येऊन त्याला शृंखलाबध्द करून बाबिलोनला नेण्यांत आले.

बाबिलोनच्या दरबारांत जेरिमियाला मानाची एक जागा देऊं करण्यांत आली.  परंतु स्वत:च्या राष्ट्राचे तुकडे करणार्‍या खुनी शत्रूशीं त्याला कांहीएक कर्तव्य नव्हतें.  तो आपल्या देशबांधवांबरोबर वनवासांत गेला.

जेरिमियाला देशद्रोही समजून झेडेकानें छळलें.  बाबिलोनच्या राजानें मूर्ख म्हणून त्याला हांकलून दिलें.

जेरिमियाचें शेवटी काय झालें तें नक्की माहीत नाहीं.  परंतु कांही प्राचीन इतिहासकारांचा पुरावा खरा मानला तर जेरिमियाला इजिप्तमध्यें दगड मारुन ठार करण्यांत आलें असें म्हणावें लागतें.

रानवट लोकांना जेरिमियानें उपदेशिलें, ''तुम्ही सज्जन माणसें बना, तुमच्या पासून प्रभूला ही अपेक्षा आहे.''  परंतु त्या रानवटांना तो अपमान वाटला.  त्यांनीं त्याला ठार केलें.

« PreviousChapter ListNext »