Bookstruck

मानवजातीचें बाल्य 26

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- ४ -

मायकेल एंजेलो या विख्यात चित्रकारानें जेरिमियाचें फार योग्य अशा स्थितींत चित्र काढलें आहे.  वृध्द जेरिमिया निराश व भग्नहृदय असा बसलेला आहे.  सभोंवतीं सारें शहर उध्वस्त झालेलें आहे.  शहराच्या त्या ढिगार्‍यावरच तो बसलेला आहे.  त्याचे डोळे जमिनीकडे खालीं जसे खिळलेले आहेत !  आजूबाजूचें दु:ख व विनाश पाहण्याचें त्याला धैर्य नाहीं.  तो डोळे वर करूं शकत नाहीं.  त्याचें जीवन म्हणजे उद्विग्न करणारी विफलता होती ;  त्यानें शांतीचा संदेश दिला.  परंतु जगानें तो ऐकला नाही.  लक्ष न देणार्‍या जगाला त्यानें शांतीचें उपनिषद् दिलें.  स्वत:च्या नगरीचें वैभव रहावें, राष्ट्राचा प्राण वांचावा म्हणून त्यानें प्राणपर कष्ट केले.  परंतु धूळ व राख यांच्या राशीखालीं जेरुसलेम गडप झालें.  आणि तेथले नागरिक वाळूच्या कणांप्रमाणें जगभर वारेमाप फेंकले गेले.  त्या थोर इटॅलियन चित्रकारानें जेरिमिया म्हणजे 'मृतप्राय जातीचा पराभूत व भग्नमनोरथ असा प्रेषितच' जणूं रंगविला आहे.

परंतु मायकेल एंजेलोचें हें चित्र कित्येक शतकांपूर्वीचें आहे.  आज जेरिमियाला आपण निराळ्या प्रकाशांत पाहूं शकतों.  जूडा येथील टेकड्यांवर उभा राहून जेरिमिया विजयी मुद्रा धारण करून शेंकडों, हजारों वर्षांच्या अंतरावरून पहात आहे.  २५०० वर्षांपूर्वी त्यानें जी वाणी उच्चारिली ती वार्‍यावर गेली.  परंतु त्याचे ते शब्द आतां पकडले गेले ओत.  ज्यू लोकांचें जें अवशिष्ट असें विस्कळित राष्ट्र आहे त्यानें जेरिमियाचे ते शब्द परंपरेनें आजपर्यंत आणून पोंचविले आहेत.  त्या शब्दांचा प्रतिध्वनि नि:शस्त्रीकरणाच्या सभांतून, जागतिक न्यायमंदिराच्या विचारविनिमयांतून, राष्ट्रसंघाच्या बैठकींतून ऐकूं येत आहे.  जेरिमिया उभा आहे.  स्वत:च्या परिश्रमाला येणार्‍या फळांकडे तो लांबून पहात आहे.  त्याच्या सौम्य मुखमंडलावर विजयाचें मंदस्मित झळकत आहे.  जीवनाचा खरा मार्ग शांतीचा आहे ही गोष्ट अस्पष्टपणें का होईना आतां मानवाच्या ध्यानांत येऊं लागली आहे.

अत्याचाराचा प्रतिकार करूं नका असें सांगणारा जेरिमिया हा महान् आचार्य होता.  सर्व इतिहासांतील अत्यंत प्रचंड व भव्य अशा चळवळीचा तो संस्थापक होता.

« PreviousChapter ListNext »