Bookstruck

तरवारीचें व फांसाचें थैमान 43

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पूर्वजांप्रमाणें त्यानेंहि लोकांस छळण्याचे नाना प्रकार शोधून काढले.  जुन्या ग्लॅडिएटर लढाया त्याला फिक्कट वाटत.  सम्राटाचें समाधान होण्याइतकें मारण-मरण त्यांत नसे म्हणून त्या खेळांत त्यानें अंगावर कांटा आणण्यासारख्या आणखी कांही प्रकारांची भर घातली.  खरोखरच कैद्यांनीं भरलेली गलबतें टायबर नदींत उभीं करण्यांत आली व एकोणीस हजार कैदी एकमेकांवर तुटून पडले ! ते आपापले प्राण एकमेकांपासून वांचवूं लागले.  किती तरी कैदी ठार झाल्यावर ती करमणुकीची लढाई संपली.

तो स्वत:ला मोठा खेळाडू समजे.  एकदां दोघां ग्लॅडिएटरांनीं परस्परांस भोंसकून ठार केलें तेव्हां त्यानें त्यांच्या दोन्ही तरवारींचे नक्षीदार कांटे केले ; त्या कांट्यांनीं तो जेवे.  जेवतांना जणूं त्या दोन मृतात्म्यांची तो स्मृतीच करी !  पूर्वीच्या सम्राटांनीं आपणांविरुध्द कट करणार्‍यांस ठार मारलें होते.  क्लॉडियस त्यांच्याहि पुढें गेला.  त्याच्या मित्रांना पडलेल्या स्वप्नांत जे लोक त्याच्याविरुध्द कट करीत आहेत असें त्यांना दिसे, त्यांनाहि तो ठार करी.  एकाद्यानें जर ''माझ्या स्वप्नांत अमुक माणूस आला व तो तुमच्याविरुध्द कट करीत आहे असें मला दिसलें'' असें सांगितलें, तर त्या स्वप्नांत दिसलेल्या खर्‍या माणसास लगेच ठार मारण्यांत येई.  क्लॉडियसच्या मित्रांना आपणांस नको असलेले लोक जगांतून नाहींसे करण्याला हा फारच सोपा उपाय सांपडला होता.

- २ -

मागील कांही पृष्ठांत रोमच्या कांही प्राचीन सम्राटांनीं केलेल्या अत्याचारांपैकीं पाशवी क्रूरतेचे कांहीं प्रकार नमुन्यादाखल दिले आहेत.  ते सारे लज्जास्पद आहेतच, पण पुढें नीरोनें केलेल्या अनन्वित प्रकारांचा ते प्रकार म्हणजे नुसता प्रारंभच होता.  नीरो हा या सर्व तिरस्करणीय पिशुनांचा अनुकंपनीय मुकुटमणि होता.

नीरो हा क्लॉडियसच्या आग्रिप्पिना राणीला तिच्या पहिल्या नवर्‍यापासून झालेला मुलगा.  इ.स. ३७ मध्यें म्हणजे ख्रिस्ताला क्रॉसवर चढविल्यानंतर चार वर्षांनीं तो जन्मला.  पुढें त्याच्या आईनें क्लॉडियसशीं लग्न केलें व ती रोमची राणी झाली.  नीरो तेव्हां अकरा वर्षांचा होता.

आग्रिप्पिना ही क्लॉडियसची चौथी पत्नी.  त्यानें पहिल्या दोघींना सोडचिठ्ठी दिली होती व तिसरीला ठार केलें होतें.  आपलीहि तीच गत होऊं नये म्हणून नीरोच्या आईनें या नव्या नवर्‍यालाच विष देऊन ठार केलें !  क्लॉडियस विषप्रयोगानें मेला तेव्हां नीरो सतरा वर्षांचा होता.  तो कायदेशीररीत्या गादीचा मालक नव्हता.  कारण, क्लॉडियसला ब्रिटॅन्निकस नामक औरस मुलगा होता.  पण बादशहा कोणास करावयाचें हें बादशाही गार्डांच्या हातीं असे.  ते वाटेल त्याची निवड करीत व सीनेटरांना त्याला मान्यता द्यावी लागे.  न दिली तर गार्डांच्या तरवारी तयारच असत ! राजा मरतांच आग्रिप्पिना आपल्या पुत्राला—नीरोला—घेऊन बादशाही गार्डांच्या मुख्याकडे-बुर्र्‍हसकडे—गेली.  ती सुंदर व मोहक होती.  तिला पावित्र्याची मुळींच चाड नव्हती—बुर्र्‍हसला चुंबनें देऊन व त्याचीं चुंबनें घेऊन तिनें प्रार्थना केली व चुबनांच्या भरीला प्रत्यक्ष भरपूर लांचहि दिली.  तिनें बुर्र्‍हसला या दोन प्रकारांनी पटवून दिलें कीं, गादीवर ब्रिटॅन्निकसपेक्षां नीरोचाच हक्क अधिक आहे. 

शेवटीं मोठ्या समारंभानें सम्राट् म्हणून नीरोच्या नांवें द्वाही फिरविण्यांत आली.  ईश्वरानें नेमलेला रोमचा सम्राट् म्हणून तो गादीवर बसला.  ईश्वराची ही इच्छा रोमनांच्या अनुभवास पूर्णपणें यावी म्हणून त्यानें ब्रिटॅन्निकसला विष देऊन ठार केलें !  आग्रिप्पिनानें क्लॉडियसला नव्हतें का ठार केलें ? सुपात्र मातेचा तो सत्पात्र पुत्र होता.

« PreviousChapter ListNext »