Bookstruck

तरवारीचें व फांसाचें थैमान 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- ३ -

पांच वर्षेपर्यंत राज्यकारभाराचीं सूत्रें हातीं घेण्याची इच्छा त्यानें दाखविली नाहीं ; आई, बुर्र्‍हस व शिक्षक सिनेका यांना राज्यकारभार चालविण्याची त्यानें मुभा दिली.  तो आपल्या मित्रांसह भरपूर दारू पीत राही, सर्व सुखांचा पेला ओंठांना लावून बसे.  जवळच्या शेतकर्‍यांच्या डोक्यांवरील टोप्यांसारख्या टोप्या घालून व वेष बदलून तो व त्याचे मित्र सर्वत्र भटकत, लोकांना ठोकीत, बदडीत, यथेच्छ दारू पीत व रस्त्यांतून जाणार्‍यायेणार्‍यांस धरून गटारांत फेंकीत.  असल्या बेताल गुंडगिरीच्या एका संचारसमयीं नीरोनें एका सीनेटराच्या पत्नीवर हल्ला केला तेव्हां त्यानें नीरोला मरे मरेतों मारलें.

तो एकाद्या सामान्य ठगाप्रमाणें खासगी रीतीनें व चोरून असा वागत होता, तोंपर्यंत रोम जरा सुरक्षित होतें.  पण त्याच्या आईला त्याचें हें वर्तन पसंत नसे.  राज्याचा कारभार आपल्या मुलानें स्वत: सिंहासनावर बसून हांकावा असें तिला वाटत असे.  पण नीरो सुखासक्त असल्यामुळें तिच्या म्हणण्याकडे लक्ष देत नसे.  क्लॉडियसच्या मृत्यूपूर्वी त्याची मुलगी ऑक्टेव्हिया हिच्याशीं नीरोचें लग्न झालें होतें.  तो रोम शहराची उपेक्षा करी, तद्वतच पत्नीकडेहि लक्ष देत नसे.  अ‍ॅक्टे नामक ग्रीक दासकन्येसह तो उघडपणें राहूं लागला.  आग्रिप्पिना पूर्णपणें निराश झाली.  तिनें मुलाला परोपरीनें विनवून पाहिलें, अ‍ॅक्टे हिचा नाद सोडून देण्याबद्दल प्रार्थून सांगितलें, धमक्याहि दिल्या ; पण कशाचाहि उपयोग झाला नाहीं.  राजवाडा कौटुंबिक कलहाची युध्दभूमि बनला.  नीरोच्या मित्रांनीं व खुशामत्यांनीं त्याची बाजू घेतली.  ते त्याला म्हणत, ''तुझी आई म्हातारी आहे; तिचें काय ऐकतोस ? तिच्या हातचें बाहुलें नको बनूं.  असा मागें मागें कां राहतोस ? स्वत:च्या हातीं सत्ता घे.  आईचें काहींहि चालूं देऊं नको.'' तो मित्रांच्या सल्ल्यानुसार वागूं लागला, त्यामुळें मायलेकरांना एकत्र राहणें अशक्य झालें.  आग्रिप्पिना राजवाडा सोडून दुसरीकडे राहावयास गेली.

परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडतच चालली.  ऑथो नामक एका प्रिय मित्राच्या पॉप्पिआ नामक पत्नीच्या प्रेमपाशांत नीरो सांपडला.  ती सुंदर होती ; पण सुंदर होती तितकीच अनिर्बंध होती.  नीतीचा व तिचा मुळींच संबंध नव्हता.  प्रख्यात इतिहासकार टॅसिटस लिहतो, ''या सुंदरीजवळ प्रामाणिक मनाशिवाय बाकी सर्व कांही होतें.''  नीरो दृष्टीस पडल्या वेळींच तिनें रोमची सम्राज्ञी होण्याचें ठरविलें होतें ; पण तिच्या महत्त्वाकांक्षेच्या आड तिचा पति, नीरोची पत्नी व नीरोची माता अशा तीन व्यक्ति येत होत्या.  आपला पति व नीरोची पत्नी यांची अडचण, रोममध्यें त्या काळीं घटस्फोट ही अगदींच मामुली बाब असल्यामुळें, सहज दूर होण्यासारखी होती.  पण आग्रिप्पिना हिची बाब मात्र जरा कठिणच होती.  तिला कसें दूर करावें याचा विचार पॉप्पिआ करीत होती.  शेवटीं ती या निर्णयावर आली कीं, नीरोच्या आईला ठारच मारलें पाहिजे.

एकदां ती नीरोजवळ अशा अर्थाचे थोडेसे सूचक शब्द सहज बोलली.  नीरोच्या मनांतील मातृमत्सर, अहंकार, विषयासक्ति, मूर्खपणा, इत्यादि मनोविकार आपल्या कोमल व कपटी भाषणांनीं आणि हावभावांनी प्रज्वलित करून तिनें त्याला आपल्या कटांत ओढून घेतलें व असें भासविलें कीं, त्याची आई मेल्यावांचून त्याचा स्वत:चाहि बचाव होणार नाहीं, स्वत:च्या प्राणांसाठीं तरी त्याला आईचा प्राण घेणें अपरिहार्य होतें.

« PreviousChapter ListNext »