Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 40

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एम. व्हॅकॅन्दार्डचाहि एक उतारा वाचूं या :— ''कायद्याप्रमाणें छळ एकदांच करावयाचा असे; हा कायदा सहज मोडण्यांत येत असे. .......पुन: छळ करावा असें जेव्हां त्यांना वाटे तेव्हां मध्यंतरी कांहीं दिवस गेलेले असले तरी इन्क्विझिटर्स म्हणत, 'आम्ही नव्यानें छळ करीत नसून पूर्वी अर्धवट राहिलेलें छळण्याचें काम पूर्ण करीत आहों. छळ पुढें चालू आहे.' असा शब्दच्छल करून ते निर्दयपणें अपराध्याचा पुरा पुरा छळ करीत व आपली रानटी हौस पुरवून घेत.'' आणि छळाला कंटाळून एकाद्या अपराध्यानें 'अत:पर मी भला कॅथॉलिक होईन' असें कबूल केल्यास त्याला जन्मभर तुरुंगांत ठेवण्यांत येई. पण इतका छळ झाला तरीहि ख्रिस्ताच्या बाहुपाशांत जाण्याचें हट्टानें नाकारणार्‍यास अग्निज्वाळांच्या स्वाधीन करण्यांत येई. तात्त्विक दृष्ट्या चर्च म्हणे, ''आम्ही केवळ शिक्षा फर्मावतों. प्रत्यक्ष शिक्षा देण्याचें काम स्टेटचें आहे. आम्हांला हत्येचा दोष नाहीं.'' चर्च त्या अपराध्यांना असलेलें संरक्षण काढून घेई व त्या अनाथांना स्टेटच्या स्वाधीन करी. अशा रीतीनें चर्चचे हात वरवर पाहणारास निर्दोष दिसत. अर्वाचीन इतिहासकारहि शब्दांचा खेळ करून चर्चला निर्दोषी ठरवूं पाहत असतात. एकोणिसाव्या शतकांतील इतिहास-लेखक जोसेफ डी मेस्ट्री लिहितो, ''आपण इन्क्विझिशनची चर्चा करीत असतों तेव्हां स्टेटच्या व चर्चच्या कामांतील फरक आपण लक्षांत घेतला पाहिजे. या न्यायसंस्थेंत जें जें भयंकर व भीषण असे तें तें स्टेटचें असे. विशेषत: मरणाची शिक्षा स्टेटच अमलांत आणी व जी जी न्याय्यता वा सदयता असे तिचें श्रेय मात्र चर्चकडे जाई.''

पण खरें पाहिलें तर चर्चच देहान्त-शिक्षा देई, येवढेंच नव्हे तर तदर्थ आग्रह धरी. 'यांना ठार मारलेंच पाहिजे' असें चर्चचें निक्षून सांगणें असे. पोप चौथा इनोसंट याचें एक शासनपत्र आहे. त्यांत असें म्हटलें आहे कीं, ''चर्च जे जे अपराधी स्टेटच्या ताब्यांत देईल त्यांना त्यांना स्टेटनें पांच दिवसांच्या आंत जाळलेंच पाहिजे.'' चर्चनें गुन्हेगार ठरविलेल्यांस न जाळणार्‍या राजांना चर्च धर्मबाह्य, बहिष्कृत व नरकास योग्य ठरवी. पण सर्वांत अधम कृष्णकृत्य म्हणजे मारल्या वा जाळल्या जाणार्‍यांच्या मुलांना वागवितांना दाखविण्यांत येणारी निर्दयता. मनुष्य खांबाला बांधून जाळला गेल्यावर चर्च त्याची सारी मालमत्ता जप्त करी; त्याच्या मुलांबाळांना एक पैहि मिळत नसे. एकाच अटीवर नास्तिक बापाच्या मुलाबाळांना वडिलांच्या इस्टेटींतला थोडासा भाग मिळूं शकत असे. ही अट कोणती ? मुलांनीं बापावर हेरगिरी करावी ही ! आपला बाप नास्तिक आहे अशी बातमी देणार्‍या मुलास थोडी इस्टेट मिळे. ही अट तर अधिकच नीचतेची व क्रूरतेची द्योतक आहे. मुलांना बापांचे जणूं मारेकरी बनविण्यांत येई ! आणि तेंहि कशासाठीं ? तर दोन दमड्यांसाठीं ! अशी अट असेल असें मानवतहि नाहीं ! पण दुसर्‍या फ्रेडरिकनें खरोखरच असा एक कायदा केला होता व बर्‍याच इन्क्विझिटरांनीं—विशेषत: टॉर्कीमीडा यानें या कायद्याच्या अक्षराबरहुकूम अमलबजावणी केली. चर्चचे पिते हा कायदा मानीत येवढेंच नव्हे, तर त्यांना या कायद्याचा अभिमान वाटे. 'ईश्वराच्या प्रेमानें प्रेरित होऊन मुलें आपल्या पित्यांच्या-आईबापांच्या-विरुध्द जात आहेत हें पाहून माझें हृदय उचंबळून येतें' असें नववा ग्रेगरी म्हणे.

ख्रिस्त म्हणे, ''लहान मुलें मजकडे येऊं देत.'' इन्क्विझिशन संस्थेचें भ्रातृ-मण्डळ म्हणे, ''होय, प्रभो ! मुलें तुमच्याकडे येतील; पण आम्ही त्यांना छळूं तेव्हांच तीं येतील. तुझ्याकडे त्यांनीं जावें यासाठीं त्यांना छळावें लागेल.''

« PreviousChapter ListNext »