Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 41

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- ३ -

इन्क्विझिशनचें एक प्रमुख कार्य व टॉर्कीमीडाच्या जीवनाचा कळस म्हणजे स्पेनमधून ज्यूंचें उच्चाटन हें होय. टॉर्कीमीडा तरुण होता तेव्हां पुढें जी राजा फर्डिनंडची राणी झाली त्या राजकन्या इझाबेलाचा तो धर्मगुरू होता. इझाबेला आपल्या धर्मांध गुरुप्रमाणेंच रानटी, मूर्ख, धर्मवेडी व धार्मिक होती. टॉर्कीमीडाच्या सतत सांगण्याचा चित्तावर परिणाम होऊन ती म्हणाली, ''नास्तिकतेचीं पाळेंमुळें खणून काढण्यांत मी आपली जिंदगी व्यतीत करीन.''

स्पेनची राणी झाल्यानंतर तिच्या उत्साहांत तिला एक भागीदारहि मिळाला. तो म्हणजे तिचा नवराच. राजा-राणी धर्मकर्माला वाहून घेतीं झालीं. फर्डिनंडसारखा स्वार्थलोलूप व हांवरा राजा इतिहासांत दुसरा झाला नाहीं. तो ज्यूंना जिवंत जाळूं इच्छीत असे. कारण, ज्यूंपाशीं भरपूर धन-दौलत असे. ज्यूंना जाळल्यावर त्यांची संपत्ति राजा व चर्च यांच्यांत निंमेनिम वाटली जाई. टॉर्कीमीडा यानें स्पेनच्या राजाला सारे ज्यू स्पेनमधून घालवून देण्यास सांगितलें. तेव्हां स्पेनचा राजा आनंदला. कारण, ज्यूंची एकजात हकालपट्टी म्हणजे त्यांची एकजात लूट—ज्यूंचें सोनें, जडजवाहीर वगैरेंतील बराचसा भाग राजाच्या तिजोरींत येणें—असल्यामुळें लेखणीच्या एका फटकार्‍यानें तो युरोपांतील सर्वांत श्रीमंत मनुष्य होऊं शकत होता.

इझाबेलाला स्वत:ची विचारशक्तिच नव्हती. ती टॉर्कीमीडाच्या हातचे बाहुलें असल्यामुळें ज्यूंच्या मूलोत्पाटनांत सामील झाली. ज्यूंच्या उत्पाटनाचा कायदा तयार होऊन राजाची सही होण्यासाठीं त्याच्यापुढें ठेवला गेला. तेव्हां राजाच्या हृदयाला पाझर फुटावा म्हणून ज्यूंनीं शक्य तें सारें केलें. धार्मिक असहिष्णुतेमुळें ते सर्वच देशांतून हांकलले जात होते. त्यांना कोठेंहि थारा मिळेना, निवारा लाभेना. ते दशदिशांत इतस्तत फेंकले जात होते. ते राजा फर्डिनंड याला एकच गोष्ट पुन:पुन: सांगत होते, ''राजा, आम्हांला शांतपणें राहूं दे; कृपा कर.'' त्यांनीं राजाकडे उत्कृष्ट वक्ते पाठविले. मूर लोकांविरुध्द ख्रिश्चनांनीं व राजा फर्डिनंड यानें ज्या लढाया केल्या त्यांत ज्यूंनीं मदत केली होती. तें राजाला तीस हजार ड्यूकट्स् द्यावयास तयार झाले. त्या काळांत ही रकम लहान नव्हती; राजाला मोह पाडील येवढी ती नि:संशय होती. राजा फर्डिनंड बुध्दिवाद ऐकण्यास तयार नव्हता, तरी सोनें त्याचें हृदय वितळवील असे वाटत होतें. पण इतक्यांत टॉर्कीमीडा राजवाड्यांत येऊन दत्त म्हणून उभा राहिला. तो या वेळीं सत्तर वर्षांचा होता. आपल्या सुरकुतलेल्या हातांत क्रॉस धरून तो मोठ्यानें ओरडला, ''हा पाहा येशू, भगवान् ख्रिस्त ! याला पूर्वी ज्युडासनें चांदीच्या तीस नाण्यास विकलें ! आज त्याला तूं पुन: तीस हजारांना विकणार काय ?''

« PreviousChapter ListNext »