Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 46

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- ४ -

कोलंबस कांहीं बाबतींत मोठा मनुष्य होता यांत शंकाच नाहीं. विज्ञानाच्या बाबतींत तो आपल्या काळाच्या फार पुढें होता. त्याचें धैर्य व त्याची चिकाटी ही अतुलनीय होती. तो स्वप्नसृष्टींत वावरणारा एक अज्ञात मनुष्य होता. पण आपलें स्वप्न प्रत्यक्ष सृष्टींत आणलें जावें म्हणून त्यानें राजाचें मन वळविलें. अज्ञात महासागराच्या पृष्ठावर साहसाचें नवीन महाकाव्य लिहिणारा तो महाकवि होता. तो धर्मान्ध, संकुचित, डामडौली, स्वार्थी व अहंकारी होता. दैवाचें वैभव व सुवर्णाचा लखलखाट या दोन गोष्टींसाठीं त्यानें आपलें सारें जीवन वाहिलें होतें; पण त्याचीच कसोटी लावून पाहिलें तर त्याचे जीवन विफल झालें असेंच म्हणावें लागेल. त्याला परधर्मीयांस ख्रिश्चन धर्म देतां आला नाहीं कीं स्पेनमध्यें सोनेंहि आणतां आलें नाहीं. स्पॅनिश लोकांनीं इंडियनांस वाईट रीतीनें वागविलें. इंडियनांनींहि त्यांना त्याच प्रकारें उत्तर दिलें. त्यांनीं जशास तसें केलें. एका हातांत क्रॉस व एका हातांत चाबूक घेऊन येणार्‍या या पाहुण्यांविषयीं इंडियनांना विश्वास वाटेना. स्पेनमध्यें थोडे दिवस राहून कोलंबस वेस्ट इंडीज बेटांत परत आला, तेव्हां मागें ठेवलेल्या शिबंदींतील एकहि मनुष्य जिवंत नाहीं असें त्याला आढळून आलें !

अमेरिकेंत तो एकंदर चारदां आला. तो पुन: पुन: सोनें व हिरेमाणकें शोधीत होता. पण त्याचा सारा शोध फुकट गेला. राजा फर्डिनंड अधीर झाला. कोलंबस खूप सोनें आणून देईल अशी राजाची अपेक्षा होती. पण प्रत्यक्ष सोनें मिळण्याऐवजीं सोन्याचीं फक्त अभिवचनेंच मिळत. वस्तुस्थिति काय आहे, सोन्याच्या मार्गांत कोणतें विघ्न आहे हें पाहण्यासाठीं राजानें बोबॅडिला नांवाचा एक दरबारी सरदार पाठविला. बोबॅडिला आला व बेटांचें संशोधन केल्यावर त्याला असें आढळून आलें कीं जो प्रदेश कोलंबसानें शोधला होता तो भिकार होता. कोलंबसानें अपराध केला होता—त्यानें राजाला फसविलें होतें. म्हणून त्या सरदारानें कोलंबसाला कैद करून फर्डिनंड राजासमोर कैदी म्हणून उभें केलें. त्याचें हें करणें पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धांत स्पॅनिश न्यायनीतीचा जो प्रकार होता त्याला अनुरूपच होतें.

- ५ -

कोलंबस अज्ञात जन्मला व अज्ञातपणेंच मेला. त्यानें जगाला नवीन खंड दिलें : जगानें त्याला शृंखला लेववून कृतज्ञता दाखविली ! त्याच्या शोधाचें महत्त्व त्या काळीं कोणालाहि समजलें नाहीं.

इ.स.१५०३ मध्यें अमेरिगो व्हेस्पुक्कि नामक इटॅलियन साहसिकानें 'नवीन जग' म्हणून एक वृत्तान्त प्रसिध्द केला. हें नवीन जग आपण १४९७ मध्यें शोधलें असें तो म्हणतो. पण ती सारी असत्यकथा होती. तथापि त्याच वेळेस एक जर्मन प्रोफेसर जगाचा भूगोल छापीत होता, त्यांत त्यानें या नव्या खंडाला अमेरिका असें नांव दिलें. अमेरिगोनें जें खोटेंच सांगितलें ते खरें मानून त्याचेंच नांव या नव्या खंडाला त्या जर्मन प्रोफेसरानें दिलें.

इतिहासांतला हा केवढा विरोध आहे कीं ज्यानें खरोखरच प्रथम इ.स. १००० मध्यें अमेरिका शोधली त्याचें नांवहि कोणास माहीत नाहीं ! ज्यानें पुन: दुसर्‍यांदां (१४९२ मध्यें) ती शोधली त्याला अमेरिकेचा पहिला शोधक मानण्यांत येतें !! आणि ज्यानें मुळींच कांहीं न करतां सन १४९७ सालीं आपण अमेरिका शोधली अशी नुसती गप्प मारली त्याचें नांव त्या नव्या जगास मिळून अमर झालें !!! घोडचुका करणारी आपली ही मानवजात खरोखरच्या कर्तृत्वाबद्दल मानसन्मान कसे वांटीत असते याचें हें एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

« PreviousChapter ListNext »