Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 47

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकरण १० वे
कला-विज्ञान-वेत्ता लिओनार्डो डी व्हिन्सी
- १ -

समुद्राच्या अज्ञात मार्गाचें संशोधन करण्यांत कोलंबस गुंतला असतां दुसरा एक मोठा प्रगति-वीर मानवी बुध्दीच्या व मनाच्या अज्ञात प्रदेशांत प्रकाश पसरीत जात होता—त्या अज्ञात क्षेत्रांत रस्ते तयार करीत होता. या अपूर्व विभूतीचें नांव लिओनार्डो डी व्हिन्सी. नवयुगांतील संस्कृतीचा हा अत्यंत परिपूर्ण असा नमुना होता असें म्हटलें तरी चालेल. त्याची सर्वगामी बुध्दिमत्ता हें त्याच्या पिढींतील एक महदाश्चर्य होतें. ''येवढ्याशा लहान डोक्यांत इतकें ज्ञान मावतें तरी कसें ?'' असें मनांत येऊन लोक त्याच्याकडे बघत राहत व त्यांचें आश्चर्य अधिकच वाढे. आजचें आपलें युग विशिष्ट क्षेत्रांत पारंगत होण्याचें आहे. अशा स्पेशलायझेशनच्या काळांत लिओनार्डोच्या अपूर्व बुध्दिमत्तेची अनंतता लक्षांत येणें जरा कठिण आहे. त्याच्या सर्वकष बुध्दीची आपणांस नीट कल्पनाहि करतां येणार नाहीं. लिओनार्डोनें जे जें केलें तें पहिल्या दर्जाचें केलें. कोठेंहि पाहिलें तरी तो पहिला असे. तो जें कांही करीं तें उत्कृष्टच असे. सारें जगच त्याचें कार्यक्षेत्र होतें. अमुक एक विषय त्यानें वगळला असें नाहीं. जगांतील सौंदर्यांत त्यानें नवीन सौंदर्य ओतलें. जगांतील सौंदर्याची गूढता समजून घेण्याची तो खटपट करी. तो चित्रकार होता, शिल्पकार होता, इमारती बांधणारा होता, एंजिनियर होता, वाद्यविशारद होता, शारीर शास्त्रज्ञ होता,  संशोधक होता, रंगभूमीची सजावट करणारा होता, नैतिक तत्त्वज्ञानी होता. त्याच्यांत सारें एकवटलेलें होतें. सार्‍या कला व शास्त्रें मिळून त्याची मूर्ति बनली होती. मरतांना अप्रसिध्द अशीं पाच हजार पृष्ठें तो मागें ठेवून गेला. या पांच हजार पृष्ठांपैकीं पन्नास पृष्ठांकडेहि आपण किंचित् पाहिलें तरी त्याच्या मनाची व्यापकता आपणांस दिसून येईल. त्या पन्नास पृष्ठांत लिओनार्डोनें पुढील विषय आणले आहेत :— प्राचीन दन्तकथा व मध्ययुगीन तत्त्वज्ञान, समुद्राच्या भरती-ओहोटींचीं कारणें, फुप्फुसांतील हवेची हालचाल, पृथ्वीचें मोजमाप, पृथ्वी व सूर्य यांमधील अंतर, घुबडाची निशाचरत्वाची संवय, मानवी दृष्टीचे भौतिक नियम, वार्‍यांत वृक्षांचें तालबध्द डोलणें, उडणार्‍या यंत्राचें स्केच, मूत्राशयांतील खड्यावर वैद्यकीय उपाय, वार्‍यानें फुगविलेलें कातड्याचें जाकीट घालून पोहणें, प्रकाश व छाया यांवर निबंध, क्रीडोपवनाचा नकाशा, नवीन युध्दयंत्रें, सुगंध बनविण्याच्या पध्दतींचें टांचण, स्वतंत्र भौमितिक सिध्दान्तांची यादी, पाण्याच्या दाबाच्या शक्तिचे प्रयोग, पशुपक्ष्यांच्या संवयींचें निरीक्षण-परीक्षण, निर्वाततेवर निबंध, शक्ति म्हणून वाफेचा उपयोग करण्याची योजना, नवीन म्हणींवर प्रकरण व चंद्राच्या रचनेसंबंधी माहिती.

लिओनार्डोच्या पाच हजार पृष्ठांपैकीं पन्नासच पृष्ठें आपण घेतलीं तरी त्यांत आलेल्या अनेक विषयांपैकीं फक्त एकदशांशच वरच्या यादींत आलेले आहेत. यावरून या पांच हजार पृष्ठांत किती विषयांवर टीपा-टिप्पणी आल्या असतील याची कल्पनाच करणें बरें. या शेकडों विषयांत आणखी पुढील कलानिर्मितीची भर घाला :— अत्यंत निर्दोष असें मोनालिसा पोर्ट्रेट, 'शेवटचें जेवण', हें अत्यंत सुंदर चित्र आणि त्या काळांत आठवें आश्चर्य मानला जात असलेला त्यानें तयार केलेला घोड्यावर बसलेल्या स्फोर्झाचा पुतळा. असा लिओनार्डो होता. त्याच्या बुध्दीची वा प्रतिभेची खोली येईल का मोजतां ? त्याच्या खोल बुध्दींत व प्रतिभेंत येईल का डोकावतां ?

निसर्गाला क्षुद्र मानवांबरोबर सतत प्रयोग करीत राहिल्यामुळें कंटाळा येत असेल व म्हणून तो मधूनमधून एकादा खराखुरा मनुष्य निर्माण करतो. लिओनार्डो हा असला खराखुरा मनुष्य होता.

« PreviousChapter ListNext »