Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- ४ -

यंत्रांचा शोध लागल्यामुळें जगांत औद्योगिक युग सुरू झालें होतें. पैसा आतां राजा झाला होता. बँकर्स, कारखानदार, दुकानदार, यांचा एक नवीनच प्रतिष्ठित वर्ग-पुंजीपतींचा वर्ग-पुंजीपतींचा वर्ग-निर्माण झाला. स्टेटमध्यें, शासनसंस्थेंत त्यांचें वर्चस्व असे. जुना जमीनदारांचा वर्ग लोपला, नवीन भांडवलशाही जन्माला आली. सरंजामशाहींतील कुळांची जागा आतां मजुरीनें काम करणार्‍यांनीं घेतली. मार्क्सच्या पूर्वी रिकॉर्डोनें दाखविलें होतें कीं, भांडवलशाही कामगारांच्या पिळणुकीवर आधारलेली आहे. पण या पिळणुकीचें कारण काय, ही पिळवणूक कशी होते, हें त्यानें सांगितलें नाहीं कीं ही पिळवणूक कशी दूर करतां येईल याचा उपायहि त्यानें दाखविला नाहीं. मार्क्सनें या दोन्ही गोष्टी केल्या.

मार्क्स म्हणतो, ''श्रम ही देखील एक विक्रेय वस्तु आहे. श्रमाचा विक्रेता म्हणजेच मालक इतर विक्रीच्या वस्तूंप्रमाणेंच स्वस्त मिळेल तेवढें पाहतो. एकाद्या वस्तूची किंमत तिच्या उत्पादनाला येणार्‍या खर्चावरून ठरत असते. श्रमाची किंमत काय ? श्रमणारा मजूर काम करण्यासाठीं जिवंत राहील इतकी मजुरी त्याला देणें म्हणजे त्याच्या श्रमाची किंमत. भांडवलदाराचा नफा त्याला श्रम कमींत कमी पैशांत मिळण्यावर अवलंबून असतो. कामगाराला जी मजुरी मिळते व तो प्रत्यक्ष जितकें पैदा करतो त्या दोहोंतील अंतरालाच अतिरिक्त मूल्य म्हणतात; मालकाचा नफा तो हाच. भांडवलदारांस श्रम ही एक निर्जीव वस्तु वाटते. कामगार हा मानवप्राणी नसून जणूं एक हात आहे अशी त्यांची समजूत असते. श्रम स्वस्तांत स्वस्त विकत घेऊन त्यांतून निर्माण होणारें जास्तींत जास्त किंमतीस विकणें असा भांडवल शाहीचा व्यवहार असतो. पण यांत भांडवलदारास दोष देतां येणार नाहीं. कामगारांचा तर दोष नसतोच. अर्थशास्त्राच्या कायद्याप्रमाणें दोघेहि वागतात. अर्थशास्त्राच्या कायद्यांवर कोणाची सत्ता चालणार ?

कामगाराला मिळतें त्याच्या किती तरी पट तो देत असतो. तो स्वत: खर्च करतो त्यापेक्षां किती तरी जास्त पैदा करतो. यामुळें एक विशिष्ट अशी गोष्ट घडते. वस्तू करणारे वस्तू विकत घेतल्या जाण्याच्या शक्यतेपेक्षां त्यांची शंभर पट जास्त पैदास करीत असतात. त्यामुळें कारखान्यांतील मालाचा उठाव होत नाहीं, वर्षानुवर्ष माल सांचूं लागतो व शेवटीं पैदास बंद करण्याची पाळी येते. शिल्लक पडलेला माल खपेपर्यंत कारखाने बंद ठेवणें भाग पडतें; व कांहीं काळ कारखाने बंद ठेवणें भाग पडलें कीं कामगार बेकार होतात. त्यांची क्रयशक्ति अधिकच खालावते. सांचलेल्या मालाचा उठाव होत नाहीं. तुडुंब शिगोशीग भरलेल्या वखारी रित्या होत नाहींत. आणि जगांत भरपूर खावयाला असूनहि कामगारांवर उपाशी मरण्याची पाळी येते ! भांडवलशाहीमुळें आपण अशा दु:खद स्थितीप्रत येऊन पोंचतों. मार्क्स म्हणतो, ''जर ही पध्दति बदलली गेली नाहीं, तर दर दहा वर्षांनीं असे आर्थिक हलाखीचे व आर्थिक अरिष्टाचे फेरे येतच राहतील.''  आणि मार्क्सचें हें भविष्य १९३५ च्या आर्थिक अरिष्टाच्या प्रसंगापर्यंत बिनचूक--बरोबर-लागू पडलेलें पाहून खिन्नता वाटली तरी गंमतहि वाटते.

« PreviousChapter ListNext »