Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पण मार्क्स म्हणतो कीं, सुदैवानें रोगावरचा उपाय रोगाच्या स्वरूपांतच आहे. दिवसेंदिवस अधिकाअधिक मोठीं यंत्रें कारखान्यांत येऊं लागतात, त्यामुळें हळूहळू देशांतील सारी संपत्ति कांहीं थोड्यांच्याच हातीं जमा होते. कामगारांनीं कारखाने ताब्यांत घेऊन स्वत:साठीं चालविले, तरच मूठभर लोकांसाठीं त्यांना सोसाव्या लागणार्‍या मोटभर हालअपेष्टा टळतील. मार्क्स म्हणतो, ''तुम्हांला आवडो वा न आवडो, एक गोष्ट अटळ आहे कीं, भांडवलाच्या एकीकरणांतूनच समाजसत्तावाद निश्चित येणार. भूतकालीन सरंजामशाहींतून संक्रमण करीत आपण भांडवलशाहींत आलों व आतां त्या भांडवलशाहींतूनच त्या त्या देशांतील क्रान्तिकारक उठावांमुळें भावी सहकारात्मक समाजसत्तावाद दृढमूल होईल.

आजच्या आर्थिक परिस्थितींतल्या रुग्ण भागावर मार्क्सनें बिनचूक बोट ठेवलें ही गोष्ट कोणीच नाकारीत नाहीं; पण त्यानें सुचविलेला उपाय खरा कीं खोटा हें आज काय सांगतां येणार ?

- ५ -

कॅपिटल या महाग्रंथाचा पहिला भाग मार्क्सच्या हयातींतच प्रसिध्द झाला. पण दुसरा व तिसरा हे भाग छापण्यास जाण्यापूर्वीच मृत्यूनें त्याच्या हातांतील लेखणीवर आघात केला ! कार्ल मार्क्स किती तरी वर्षे क्लेश भोगीत होता. शरीरावर सर्वत्र गळवें असत, त्यांच्या सारख्या वेदना होत. त्यांतच आयुष्याच्या शेवटीं शेवटीं डोकेंदुखीची--मस्तकशूळाची-आणखी भर पडली. १८८१ सालीं त्याला प्ल्यूरसी झाली. त्याची पत्नीहि त्याच्या शेजारच्या खोलींत कॅन्सरनें मृत्युशय्येवर पडली होती. मार्क्स मोठ्या कष्टानें उठून पत्नीची शेवटी भेट घेण्यासाठीं गेला. पतिपत्नींच्या या अंतिम भेटीविषयीं त्यांची मुलगी लिहिते, 'आई पुढल्या मोठ्या खोलींतील बिछान्यावर होती व मोहर (मार्क्स) मागच्या खोलींत होता. ज्यांचीं जीवनें परस्परांत इतकीं मिसळून गेलीं होतीं ते दोन जीवन आतां वियुक्त होणार होते. मोहर बरा झाला. त्या दिवशीं त्याला जरा बरें वाटत होतें. सकाळची वेळ होती. मी तो दिवस कधींहि विसरणार नाहीं. बाबांना आईच्या खोलींत जाण्याइतकी शक्ति वाटत होती. पुन: उभयतां जाणूं तारुण्यांत आलीं होतीं. आई प्रेमळ तरुंणी दिसत होती; बाबा प्रेमळ नवयुवक दिसत होते. उभयतां नव्यानें जीवनयात्रा सुरू करीत आहेत असें वाटत होतें. आजारानें भग्न-शीर्ण-झालेल्या वृध्दांऐंवजीं आणि मरणोन्मुख वृध्देऐवजीं दोघें जणूं उत्साहपूर्ण व यौवनसंपन्न वाटत होती ! दोघें परस्परांचा कायमचा-शेवटचा-निरोप घेत होतीं; १८८१ सालच्या डिसेंबरच्या दुसर्‍या तारखेंस फ्रॉ मार्क्स मरण पावली व पुढें पंधरा महिन्यांनीं मार्क्सहि तिला भेटावयास गेला.

« PreviousChapter ListNext »