Bookstruck

सोन्यामारुति 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पहिलें दर्शन

वेदपुरुष : वसंता! आपण दोघे गुप्त रूप घेऊं. आपणांस सारें दिसेल. परंतु आपण कोणासहि दिसणार नाहीं. आपणांस मग वाटेल तेथें जातां येईल. आपण वार्‍या सारखेहोऊं. लहानशा फटींतूनहि आपण आंत शिरूं शकूं.

वसंता : तर मग मजाच आहे. द्या मला सूक्ष्म रूप.

त्या दोघांनीं सूक्ष्म रूप धारण केलें. दोघे निघाले. वेदपुरुषाच्या पाठोपाठ वसंता जात होता. सूर्याभोंवतीं ग्रह नाचत होता.

वसंता : तुम्ही आतां कोठें नेत आहात मला ?

वेदपुरुष : सोन्यामारुतींच्या दर्शनाला.

वसंता : या बाजूला मंदिर नाहीं.

वेदपुरुष : इकडेच तर हजारो मंदिरें आहेत.

वसंता : इकडे दिव्यांचा लखलखट नाहीं, फुलांचा घमघमाट नाहीं. इकडच्या देवांची पूजा नाहीं का होत! घंटांचा आवाज नाहीं, टाळमृदंग नाहीं. इकडच्या देवळांत नाहीं का कोणी येत ?

वेदपुरुष : इकडच्या देवळांत रोग येतात, उपासमार येते. इकडच्या देवळांत दु:ख आहे, दारिद्रय आहे, दैन्य आहे, दास्य आहे. या मंदिरांतून मरणाचीं गाणीं अखंड चाललेलीं असतात. डांसांचे संगीत सुरू असतें. या मंदिरांच्या भोवतीं गलिच्छ गटारांची गंगा सदैव वहात असते. उकिरडे भरलेले असतात. या मंदिरांच्या भोंवती गलिच्छ संडास असतात, गलिच्छ पाण्याचे नळ असतात. अशा या मंदिरांतून सोन्यामारुती रहात असतात !

वसंता : फार घाण येत आहे. आपण दुसरीकडे जाऊं. नको इकडे.

वेदपुरुष : सोन्यामारुतींचें दर्शन पाहिजे. ना ? घाण सहन केली पाहिजे. चिखलांतून गेल्याशिवाय कमळ मिळत नाहीं. कांट्यांतून गेल्याशिवाय गोड बोरें मिळत नाहींत. सापांना भेटल्याशिवाय सुगंधी केतकी हाताला लागत नाहीं. नरकांतून गेल्याशिवाय स्वर्ग नाहीं. चल. एवढ्यांतच कंटाळलास ?

वसंता : धैर्य करतों. चला.

वेदपुरुष : या लांबचलांब चाळी आहेत ना ? हींच मंदिरें.

वसंता : सोन्यामारुतींचीं मंदिरें.

वेदपुरुष : चल आंत डोकावूं. देवाचीं दर्शनें घेऊं.

वसंता : या खोलींत चार पांच लोक बसले आहेत. भुतांसारखे ते दिसत आहेत. डोळे किती खोल गेले आहेत, गाल किती बसले आहेत! त्यांचे कपडे तरी पहा. किती मळलेले. आणि तो पलीकडे कोपर्‍यांत आहे ना, त्याच्या कपडयांच्या तर चिंध्या झाल्या आहेत. हे कशासाठीं जमले आहेत ? जुगार खेळणार आहेत कीं काय ?

वेदपुरुष : तूं नीट पहा व नीट ऐक. सारें समजून येईल.

खंडू : त्या मास्तराच्या रोज पायां पडतों. परंतु त्याला कांहीं अजून दया येत नाहीं. एखादेवेळेस बदली वगैरे तरी द्या असें म्हटलें, परंतु तो मनावर घेत नाहीं.

« PreviousChapter ListNext »