Bookstruck

सोन्यामारुति 17

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बन्सी : ती गांधी टोपी तुला नडली! मी सांगत होतों कीं गांधी टोपी घालूं नकोस. परंतु तूं ऐकलें नाहींस. आपल्या मॅनेजरसाहेबांस गांधी म्हणजे पाप वाटतें. मॅनेजरसाहेब आहेत धर्माचे अवतार! त्यांना अधर्म कसा खपेल?

शिवा : मोठे धर्माचे अवतार! शेंकडों रुपये पगार घेतात, चैन करतात. आमची मजुरी थोडी वाढवा म्हटलें तर तें यांच्या जिवावर येतें. जरा यायला उशीर झाला तर ठोकलाच दंड! कांहीं माणुसकी आहे कीं नाहीं ? मागें ती कडाक्याची थंडी पडली होती, त्या दिवशीं मला यायला जरा उशीर झाला. परंतु क्षमा झाली नाहीं. पायांत पायतण नाहीं. खालीं पाय बधिर होत होते. अंगांत नुसता सदरा! थंडीनें मरायचाच. पहांटे उठून पळत यावें. एक मिनिट उशीर झाला कीं गेलें सारें चुलींत. राक्षस आहेत हे सारे. स्वत: सोन्याच्या लंकेंत राहून दुसर्‍यांच्या होळ्या करणारे हे राक्षस आहेत. यांना न्याय नाहीं, नीति नाही, दया नाही. पैसा हे ह्यांचे दैवत. अशी चीड येते कीं काय सांगूं !

दगडू : अरे, त्या दिवशीं मिलच्या आवारांतील वडाचीं पानें मीं तोडलीं. औषधाला हवीं होतीं. पोरीच्या हातावर बांधणार होतों. इतक्यांत मॅनेजर तेथें आले व मला म्हणाले, ''तूं पानें तोडलींस ?'' मीं म्हटलें. ''होय.''
''मिलच्या आवारांतील वस्तूस हात लावावयाचा नाहीं हें माहीत नाहीं ? तुम्हांला आठवण राहिली पाहिजें. तुला तीन रुपये दंड केला आहे.'' मीं किती अजीजी केली. परंतु त्यांना पाझर फुटला नाहीं. दिवसभर मरायचें आणि जरा कांहीं झालें कीं मिळणारी मजुरीहि बुडावयाची. काय हें आपलें जिणें! पोरीचा हात मोडला आहे. कोठला डॉक्टर आणूं ? हात शेकायला पानेंहि मिळत नाहींत! असल्या जिण्यापेक्षां मरण बरें.

हरि : अरे, आपण हजारों वार कपडा रोज निर्माण करीत असतों. परंतु आपल्या अंगावरच्या चिंध्या मात्र टळत नाहींत. पोरांना थंडींत पांघरायला मिळत नाहीं. बायकांना लज्जारक्षणापुरतें लुगडें भेटत नाहीं. शेटजींच्या घरांत शेंकडों गाद्या पडल्या आहेत. किती रजया, किती दुलया, किती रग, किती ब्लॅकिटे. मोठमोठे पाहुणे, त्यांच्यासाठीं किती सोय! त्या गेस्टहाउसमध्यें परवां पाहिलें तर किती गाद्या तेथें ठेवलेल्या दिसल्या. आणि आपलीं पोरें थंडींत झोंपत आहेत. त्यांचीं अंगें धरत आहेत. तीं आजारी पडत आहेत. खोकले-ताप सुरु आहेत. हा न्याय कीं अन्याय ? हा देव का धर्म ?

खंडू : देव नाहीं, धर्म नाहीं. जगांत एक जुलूम मात्र आहे. त्या दिवशीं मिलचे इंजिन बिघडलें होते. आम्हांला यांनीं रजा दिली नाहीं. सारी मिल स्वच्छ करायला लावली. पुन्हा पगार नाहीं तो नाही. काम घेऊनच्या घेऊन पुन्हा हातावर तुरी! म्हणे कपडा थोडाच आज निघाला आहे! परंतु दुसरें काम घेतलेंत ना ? पण विचार कोण करतो ? मजूर म्हणजे का मनुष्य आहे?

शिवा : निर्जीव यंत्रे चालावीं म्हणून त्यांना वरचेवर तेल देण्यांत येतें. त्यांची झाडलोट होते, साफसफाई होते. परंतु आमची कोण कदर करतो ? या सजीव यंत्रांना पोटभर खायला मिळतें कीं नाहीं, यांची घरें स्वच्छ आहेत कीं नाहीं, यांना स्वच्छ हवा मिळते कीं नाहीं-इकडे कोणाचें आहे लक्ष ? आपण जिवंत असून मेलेले आहोंत. हे कारखान्याचे मालक म्हणजे सैतान वाटतात. आम्हांला पिळून पिळून चिपाडें करतात !

बन्सी : शेटजी आतां उन्हाळ्यासाठीं मसुरीला जाणार आहेत. त्यांची तयारी चाललीं आहे.

« PreviousChapter ListNext »