Bookstruck

तीन मुले 100

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘काही तरी मनात आणलेस.’
‘माझा सोन्या बरा होऊ दे.’
‘होईल हो बरा. मधुरी, मी जातो.’
‘रागावू नको हो बुधा.’

बुधा गेला. मधुरी सोन्याजवळ रडत बसली. औषधांच्या पुडया आल्या. बुधाकडून मदत आली. मधुरी दूध घेऊ लागली. सोन्याला अदमुरे ताक मिळू लागले. दिवस चालले. सोन्याचा ताप कमी होऊ लागला. हळूहळू ताप थांबला. तो अत्यंत अशक्त झाला होता. काही दिवस त्याची आठवण गेली. तो कोणाला ओळखीना, तो काही तरी बोले. कोठे तरी बघे. हळूहळू शक्ती येऊ लागली व स्मृती येऊ लागली. सोन्या बरा झाला. मधुरी पुन्हा कामाला जाऊ लागली.

परंतु तिचे आता कामात लक्ष लागत नसे. ती सारखी समुद्रावर जावयाची. शून्य दृष्टीने त्याच्याकडे पहायची. बंदरावरच्या गोष्टी ऐकायची. मंगाचे नाव कोणी काढतो का म्हणून कान टवकारायची. परंतु मंगाची बातमी नाही. वेड लागण्याची पाळी आली. ती रागावे. मुलांना मारी. तिचे मुलांवरचे प्रेम कोठे गेले? परंतु पुन्हा त्यांना जवळ घेई व नाही हो मारायची पुन्हा असे म्हणे.

गावात एक पंचांग पाहणारा होता.
एके दिवशी मधुरी त्याच्याकडे गेली.
जोशीबुवा, पंचांग पहा. माझा मंगा परत कधी येईल ते सांगा. व्यापारासाठी गेला. गलबतातून गेला. आज किती दिवस झाले पत्ता नाही. खुशाल असेल का सांगा!

जोशीबुवा पाहू लागले. हिशेब करू लागले. मध्येच डोळे मिटत. टाळी वाजवीत. पुन्हा तिरके तोंड करीत. प्रश्नार्थक व उद्गारार्थक मुद्रा करीत.
‘मोघम सांगता येईल.’
‘मोघम सांगा.’

‘तुझा मंगा परत येईल.’
‘पण कधी?’
‘ते नाही आज सांगता येणार?’
‘त्याच्यावर संकट आहे का?’
‘आहे आणि नाही.’

‘म्हणजे?’
‘प्रवासातच आहे. संकटे यायचीच. परंतु ती असून नसल्यासारखीच. तू काळजी नको करूस. सुखरूप आहे तुझा मंगा.’
दक्षिणा देऊन मधुरी गेली. परंतु तिच्या मनाची रुखरुख जाईना. का अशी सारखी रुखरुख लागावी तिला कळेना.
घरात आता आनंद नव्हता. सणवार आला तर ती मुलांसाठी गोड करी; परंतु स्वत: ती खात नसे.

« PreviousChapter ListNext »