Bookstruck

तीन मुले 101

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘आई, तू ग का नाही खात?’ सोन्या विचारी.
‘माझ्या तोंडाला चव नाही.’ ती म्हणे.

‘गोड सुध्दा तुला आवडत नाही?’
‘गोड मला कडू लागते.’

‘आणि कडू गोड लागते का?’
‘होय.’

‘मग तू कडू तरी खात जा. लिंबाचा पाला. मी आणीत जाऊ?’
‘सोन्या, तू वेडा आहेस.’

‘हल्ली शिकायला जात नाही म्हणून? पुन्हा जाऊ शिकायला बुधाकाकांकडे?’
‘नको. त्यांना त्रास होता.’

‘ते सुध्दा आजारी आहेत. होय ना?’
‘हो. त्यांना बरे नाही.’

‘बाबांनाही बरे नसेल का ग आई? तू म्हणालीस की मी बरा झालो म्हणजे बाबा येतील. परंतु ते काही आले नाहीत. कधी येतील बाबा?’

‘येतील. लांबून यायला वेळ लागतो बाळ.’
असे मायलेकरांचे संवाद चालत.

एकेक दिवस आता युगासारखा वाटू लागला. कशात राम नाही, असे मधुरीला वाटे. मुले तिला खेळायला बोलावीत तरी ती जात नसे. आई, आम्हांला गाणे सांग असे मुले म्हणत; परंतु ती गाणे सांगत नसे. आई, हास ना ग, असे ती म्हणत. ती हसूही शकत नसे. मधुरीला हृद्रोग जणू लागला. एके दिवशी ती म्हातारीकडे गेली व रडत बसली.

‘मधुरी, धीर सोडू नको. मुलांना तू हवीस हो. मुलांसाठी तरी हस, खेळ. त्या पाखरांना कोणाचा आधार? स्वत:च्याच दु:खात नको चूर होऊस. समजलीस ना! येतात असे प्रसंग. मागे एक गलबत या गावचे असेच दोन वर्षांनी परत आले. देवाला दया आहे. तो वाईट नाही करणार. उगीच चिंता करू नकोस. तू अलीकडे भुतासारखी दिसतेस. किती वाळलीस! काय झालीस तरी! किती खोल डोळे गेले!’

« PreviousChapter ListNext »