Bookstruck

तीन मुले 112

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘मला छान येते रांगोळी.’
‘तू चित्रकार आहेस. माझी किती चित्रे काढलीस सांग.’
‘दिवाळीच्या दिवशी घेऊन येईन तुझा चित्रसंग्रह.’

‘आण, मला दाखव माझी चित्रे. बुधा, मी पूर्वीसारखी दिसत्ये का रे?’
‘थोडया दिवसांनी पुन्हा तशी दिसशील.’

‘म्हणजे!’
‘झाडाला पाणी मिळाले की ते पुन्हा हिरवेगार दिसते. फुलाफळांनी बहरते, माहोरते.’

‘बुधा!’
‘काय मधुरी!’

‘तू ये हो दिवाळीत.’
‘आता मी जातो. तू हे लुगडे नेस. तुला एक विचारू?’

‘काय विचारायचे?’
‘तुला एखादा दागिना आणू?’

‘नको. नको. तू वेडा आहेस.’
‘तुला फूल आणून देईन. घालशील केसांत?’

‘लोक हसतील.’
‘माझ्यासाठी, फक्त माझ्यासमोर घाल.’

‘मला घालावेल का केसांत?’
‘मी घालीन. चालेल?’

‘टेकडीवर लहानपणी एकदा मंगाने फुले आणिली होती. माळा आणल्या होत्या.’
‘आणि त्या माळा मंगाने तुझ्या गळयात घातल्या.’

‘आणि मागाहून त्याच माळा तूही माझ्या गळयात घातल्यास.’
‘आधी मंगा, मग मी.’

‘बुधा!’
‘आणि मधुरी, त्या दिवशी रात्री नव्हते का दिले फूल?’
‘कधी?’
‘तुमच्या लग्नाचा पहिला दिवस. तू झोपडीसाठी पैसे मागायला आली होतीस.’

« PreviousChapter ListNext »