Bookstruck

तीन मुले 113

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘आणि तुझ्या उशीवर मी माझे तोंड ठेवले होते.’
‘आणि जिन्यात आपण क्षणभर थांबलो आणि तू खांद्यावर मान ठेवून रडलीस.’
‘हो. त्या दिवशी दिले होतेस फूल.’
‘आठवले सारे?’

‘हो, आठवले, आणि बुधा, तू एकदा रस्त्यातही मला फूल दिले होतेस. मी व मंगा एकत्र राहण्यापूर्वी; आणि बाबा आले. ते तुला बोलले. तुझे फूल त्यांनी कुस्करिले त्या कुस्करलेल्या फुलांच्या पाकळया मी गोळा केल्या. तुझे कुस्करलेले प्रेम मी गोळा करून घेतले. आठवते?’

‘हो आठवते. अशा त्या आठवणींवर तर मी जगतो. पुन्हा
पाकळया साधून त्यांचे फूल होईल. नाही होणार मधुरी?’
‘जादूगार करील तसे.’

‘प्रत्येक मनुष्य, मधुरी, जादूगार आहे. तो कोणाच्या ना कोणाच्या तरी जीवनातला जादूगार बनतो, तो तेथे चमत्कार करतो, ओसाड जागा फुलवतो. अंधाराचा प्रकाश करतो. हसतेस काय मधुरी? बरे, मी आता जातो. आणीन फूल व वाहील तुला.’

‘घालीन हो तुझ्यासाठी मी क्षणभर ते माझ्या केसांत.’
‘आणि बुधा गेला. मधुरी त्याच्याकडे झोपडीच्या दारातून पहात होती. त्याने वळून पाहिले. दोघांचे डोळे भेटले.’
आणि आता मुले आली.’

‘आई, हे कोणाला? किती छान. ओहो! कोणाला?’
‘आई, हा मला का?’   
‘हा मला नीट होईल.’
त्या मुलांनी आपापले कपडे ओळखून घेतले. त्यांनी अंगात घातले.

‘आई, बाबांकडून का ग हे आले? दुरून त्यांनी पाठवले?’ रुपल्याने विचारिले.
‘मनी कुठे आहे सोन्या?’
‘तो बाहेर आहे. मी तिला उचलून आणले. परंतु अंगणातील फुले पाहून उतरली.’

‘आई, ही फुले घाल माझ्या केसांत.’ मनी येऊन म्हणाली.
मधुरीने मनीला नवीन कपडे घातले. तिने ती फुले तिच्या केसांत घातली. मनी नाचू लागली. सोन्या व रुपल्याही नाचू लागले आणि मधुरीचेही मन जरा नाचत होते.

‘आई, तू नेस ना हे लुगडे!’
‘नेसेन हो.’

« PreviousChapter ListNext »