Bookstruck

तीन मुले 140

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

घरच्या मार्गावर
मंगाच्या मनात प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून राजकन्या तपश्चर्या करीत होती. ती जणू त्याची मोलकरीण बनली. ती स्वत:ची श्रीमंती विसरली. मी राजकन्या आहे ही तिची जाणीव मेली. ती एक प्रेमपूजा करणारी साधी मानव बनली. मंगाची बंगली ती स्वत: झाडी. त्याच्यासाठी स्वच्छ पाणी भरी. त्याचे कपडे धुई. त्याला फुले आणून देई. मंगा बोलत नसे. तरीही ती तेथे येऊन मुकाटयाने बसे. देवाची प्रार्थना करीत होती. प्रेमदेवाला प्रसन्न करू पहात होती.

परंतु मंगाला मधुरीचे वेड. राजकन्येचे सौंदर्य पाहून तो भुलला नाही. ती नवीन नवीन वस्त्रे रोज नेसे. नवनवीन दागिने घाली. एखादे दिवशी निर्मळ मोत्यांनी नटून येई, तर एखादे दिवशी सोन्याने पिवळी होऊन येई. कधी फुलांनी नटे व जशी वनदेवता दिसे. नाना प्रकारांनी मंगाला ती मोहू पाहत होती. परंतु मंगा अविचल राहिला.

ती त्याच्या खोलीत येऊन तासन् तास बस; जणू त्याच्याजवळ भिक्षा मागत होती. तिच्या डोळयांतूनही पाणी येई. ती दीनवाणेपणाने त्याच्याकडे बघे. परंतु मंगा बदलला नाही. त्याच्या हृदयातील मधुरी त्या अश्रूंनी वाहून गेली नाही.

असे दिवस जात होते. राजकन्या आता कठोर झाली. तिने वडिलांना सांगून मंगाला तुरुंगात अडकविले. तरुंगात त्याला अंधारकोठडीत ठेवण्यात आले. ना जगाचे दर्शन, ना कोणाचे. मधुरीचे चिंतन करीत तो बसे.

एके दिवशी राजकन्या त्याला भेटायला आली.
‘कसे काय मंगा?’ तिने विचारले.
‘चांगले आहे.’ तो म्हणाला.
‘काही इच्छा आह? ‘
‘एक आहे?’

‘कोणती?’
‘माझ्या खोलीतील ती गोधडी मला आणून द्या. मग मी येथे सुखाने राहीन. तेवढी कृपा करा.’
‘मंगा, तुला हा एकान्त आवडतो?’
‘मी एकटा कधीच नसतो.’

‘कोण आहे येथे तुझ्याबरोबर?’
‘मधुरी आहे. माझी गोड मुलेबाळे आहेत.’
‘माझी दया नाही ये तुला?’
‘माझी तुला नाही ना येत?’

‘मंगा, का असे हाल सहन करतोस? माझ्याबरोबर सुखाने राहा. सुखाचा जीव दु:खात का घालतोस?’
‘मी येथे सुखात आहे.’
‘तुझे हालहाल करवते थांब. माझ्या अंगाची आग आज तू करतोस; तुलाही आगीत लोटले पाहिजे.’

« PreviousChapter ListNext »