Bookstruck

क्रांती 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्या दिवशी रामदासच्या अंगावर भरजरी पोशाख होता. डोक्याला भरजरी टोपी होती. गळयात सोन्याची कंठी होती. मोत्याचा हार होता. बोटांतून हिर्‍याच्या आंगठया होत्या. पायांत मऊ जोडा होता. कानात अत्तराचे फाये होते. रामदास एखाद्या राजपुत्राप्रमाणे शोभत होता.

रामदास सजला होता. परंतु शांती? ती साधीच होती. तिला कोण देणार दागदागिने? ती हिंडत हिंडत रामदास बसला होता तेथे आली.

''तिकडे जा ग पोरी.'' कोणी तरी म्हटले.

'माझा दादा मला पाहायचा आहे.'' असे म्हणत शांती आत आली. शांती भावाजवळ जाऊन बसली.

''ही का तुमची बहीण?'' कोण्या पाहुण्याने विचारले.

''हो, हिचे नाव शांता. मोठी हुशार आहे.'' रामदास म्हणाला.

''परंतु तुझ्यासारखी मी श्रीमंत थोडीच आहे? तुझ्या अंगावर भरजरी कपडे, तुझ्याजवळ बसायला मला भीती वाटते, भाऊ. हे बघ तुझ्या अंगावर किती दागिने ! भाऊ, तुझी बोटं जड नाही झाली? गळा या हारांनी दुखू नाही लागला?'' शांतीनं विचारलं.

''बायका तर याच्या शतपट वजन घालतील.'' कोणी बोलला.

''वेडया बायका घालतील, मी नाही घालणार.'' शांती म्हणाली.

''उद्या लग्न होऊन सोन्यानं मढाल तेव्हा पाहू. बाप तर म्हणतो, 'पोरगी बॅरिस्टर ला द्यायची पुढे !'' तो पाहुणा म्हणाला.

''भाऊ, मी जाऊ? तू बोलत का नाहीस? एवढयातच परक्याचा झालास? दागिन्यांनी दूर गेलास?'' शांतीने विचारले.

''शांते, तू येथे का आलीस?'' भावाने प्रश्न केला.

''मला आज कोणी विचारीना म्हणून.'' ती म्हणाली.

''तुझ्या अंगावर नाही घातले दागिने कोणी?'' त्याने विचार.

''नाही भाऊ, तू दत्तक गेलास, मी नाही काही !'' शांता म्हणाली.

''शांता, तुला विचारून मी दागिने घातले. हे काढून ठेवतो मी.'' भाऊ म्हणाला.

''छेः, छेः, असे नका करू साहेब, किती पाहुणे आलेले. गोविंदरावांना काय वाटेल? राहू देत ते दागिने.'' जवळची मंडळी सांगू लागली. इतक्यात गोविंदराव तेथे आले.

« PreviousChapter ListNext »