Bookstruck

क्रांती 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''काय रामदास, आनंद आहे ना? असा खिन्न का? काय झालं रे?'' त्यांनी विचारले.

''शांतीच्या अंगावर काही नाही म्हणून त्यांना वाईट वाटत आहे, स्वतःचे दागिने ते काढीत आहेत.'' कोणी सांगितले.

''शांते, तुला हवेत होय दागिने? चल खाली.'' गोविंदराव म्हणाले.

''मला नकोत, मला नाही आवडत. भाऊलाच सजू दे, नंदीबैल.'' शांता म्हणाली.

''असं म्हणू नये शांते. पाहुणे आलेले आहेत. हट्ट करू नये. चल, मी तुला नटवितो.'' असे म्हणून शांतीचा हात धरून त्यांनी तिला खाली नेले.

''भाईसाहेब, शिरा आणू का थोडा? आणि कॉफी घ्याल की कोको?'' एक गृहस्थ लघळपणा करीत विचारू लागला.

परंतु रामदास शांत होता. तो विचार करीत होता. इतक्यात त्याच्या कानावर गाणे आले. रस्त्यात कोणी तरी गाणे म्हणत होते.

हृदय जणु कोणा ते नसे
बंधु उपाशी लाखो मरती
सुचति विलास कसे-

हाहाःकार ध्वनि शत उठती
येथे उडत जलसे-
निज भगिनींच्या अंगावरती

चिंधीहि एक नसे-
कष्ट करूनिहि गरिब उपाशी

तुमचे भरती खिसे-
नाच तमाशे करण्याचा हा

अवसर काय असे-
देव ओळखा, धर्म ओळखा

सकलां विनवितसे
खादी घेऊनी खादी घाला
इतुके मागतसे

रामदास गॅलरीत येऊन उभा राहिला. तो ते गाणे ऐकत होता. गाणे म्हणणार्‍याची व त्याची दृष्टिभेट झाली. गाणे म्हणणारा अधिकच तन्मयतेने व कळकळीने गाणे म्हणू लागला. 'निज भगिनीच्या अंगावरती, चिंधीही एक नसे' रामदासला शांता आठवली का देशातील कोटयवधी, दरिद्री मायबहिणी आठवल्या?

रामदास गंभीर होऊन आत आला. तो कोणाशी बोलेना, हसेना, खेळेना. सर्वत्र वार्ता गेली. गोविंदराव धावत आले. रामराव दूर उभे राहिले. डॉक्टर नळया घेऊन आले.

« PreviousChapter ListNext »