Bookstruck

क्रांती 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''त्यांना एकच भीती वाटते की, मी बंगालमध्ये गेलो तर क्रांतिकारक होईन. बाँबच्या भानगडीत पडेन. बाँबचे राजकारण आता मागं पडलं आहे. दहशतवादीही ते जुने मार्ग सोडून किसान-कामगारांच्या संघटनेत पडले आहेत, हे त्यांना काय माहीत? तुम्ही बरोबर असला, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल. खादीच्या बाहेर फारसा मी जाणार नाही, असा त्यांना भरवसा वाटेल. जाण्याला संमती देतील.'' रामदास म्हणाला.

इतक्यात पाठीमागून येऊन कोणी तरी रामदासचे डोळे धरले. मुकुंदराव हसू लागले.

''शांता आहे. दुसरं कोण असणार?'' रामदास म्हणाला.

''कसं रे ओळखतोस भाऊ?'' शांतेने विचारले.

''मला सारं समजतं. तू देवळात का आली होतीस तेही समजतं.'' रामदास हसत म्हणाला.

''मग शांता का आली होती?'' मुकुंदरावांनी प्रश्न केला.

''लग्न लवकर व्हावं म्हणून. बॅरिस्टर नवरा मिळावा म्हणून.'' रामदास म्हणाला.

''होय ग शांते? तू शिकणार ना होतीस?'' मुकुंदराव आश्चर्याने म्हणाले.

''भाऊचं तुम्ही काय ऐकता? ज्याला-त्याला आपणासारखंच इतर असे वाटत असंत. भाऊ, तू जातो आहेस बंगालमध्ये. बंगाली जादूगरीण भेटेल हो एखादी जपून राहा.'' शांता त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाली.

''माझी नको काळजी. मुकुंदराव आहेत माझ्याबरोबर. तुला येणार आहेत मागणी घालायला. त्या वेळेस नीट जप. नीट उभी राहा. श्रीमंत सरदारांचे चिरंजीव आहेत बरं ते. शांतीचा काय मग थाट !'' रामदास थट्टा करू लागला.

''खरंच का कोणी मागणी घालायला येणार आहेत?'' मुकुंदरावांनी प्रश्न केला.

''होय.'' रामदास म्हणाला.

''शांते, मग काय करणार तू?'' मुकुंदरावांनी विचारले.

''जो शेतात काम करील, मोट हाकील, लाकडं फोडील, शेण भरील, चिखल असो, थंडी असो, वारा असो, जुमानणार नाही, डोक्यावरून भारे आणील, बायकोबरोबर दळू लागेल. शेतकर्‍यांच्या हक्कासाठी भांडेल, किसानांचे मोर्चे काढील, क्रांतीत सामील होईल, अशाशी मी लग्न लावीन. आहेत का हे माझे पती होऊ पाहणारे तयार? असा मी प्रश्न विचारीन.'' शांता म्हणाली.

« PreviousChapter ListNext »