Bookstruck

क्रांती 34

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''असा पण आतापर्यंत कोणी केला नाही. हा पण कोण जिंकील? या पणात कोण पास होईल? शांते, तुला अविवाहितच राहावं लागेल.'' रामदास म्हणाला.

''हा पण जिंकणारा कोणी न मिळेल तर हिंदुस्थान कायमचा गुलाम राहील.'' शांता म्हणाली.

''तू अशी अट घालणार, परंतु तू काय करशील?'' रामदासने विचारले.

''मी शेतकर्‍यांत राहीन. त्यांच्या बायकांना शिकवीन. त्यांच्याबरोबर काम करीन. ज्वारीची कापणी करीन. कपाशीची वेचणी करीन. भुईमुगाला उपटीन, निंदणी-खुरपणी करीन, डोईवरून गवत आणीन, कडबा आणीन, शेतकर्‍याची खरी मुलगी होईन. उन्हात काम करून घामाघूम होऊन माझ्या ज्ञानाला पवित्र करीन. जे ज्ञान थंडीवार्‍यात, उन्हात, पावसात जायला भिते, ते ज्ञान नसून दंभ आहे. तो पोकळ अहंकार आहे.'' शांता म्हणाली.

''शांते, तू इतके विचार करायला कशी शिकलीस?'' मुकुंदरावांनी विचारले.

''ही तुमचीच वर्गातील शिकवण. तुम्हीच पेरलेलं हे उगवतं आहे.'' शांता नम्रपणे म्हणाली.

''वास्तविक शांतेनं आता लग्न करावं. लग्नापुरतं शिक्षण झालं आहे.'' रामदास म्हणाला.

''लग्नापुरतं शिक्षण? लग्नासाठी शिकायचं की, आपण माणसं आहोत म्हणून शिकायचं? पुरुषाप्रमाणे स्त्रीलाही बुध्दी, हृदय, मन आहे. त्याच्या विकासासाठी तिनं शिकायचं. केवळ दुधाचा हिशेब ठेवता येईल, भाजी विकत घेता येईल, थर्मामीटर लावता येईल, पत्र वाचता येईल, एवढयासाठी नाही शिकायचं. पतीबरोबर वादविवाद करता यावा म्हणूनही नाही शिकावयाचं. स्त्रीला आत्मा आहे म्हणून शिकावं.'' शांता म्हणाली.

''शांते, शिक. शिक. तुझं नाव शांता परंतु तू अशांत आहेस. ज्ञानाशिवाय तू कशी शांत होणार?'' रामदास म्हणाला.

''केवळ ज्ञानानं माझं समाधान नाही. गरिबांचे संसार सुंदर, सुखाचे होणार नाहीत तोपर्यंत मी अशांतच राहणार. हिंदुस्थानात प्रचंड क्रांती होईल तेव्हाच मी शांत होईन.'' शांता म्हणाली.

''शांता, ते काम सोपं नाही. पोलीस स्त्रियांवरही लाठी चालवितात; गोळीबार करतात. क्रांती म्हणजे मरण !'' रामदास गंभीरपणे म्हणाला.

''ते मरणच मी वरणार आहे. त्या मरणासाठी माझे नवस आहेत. चिनी युध्दात तरुणी कशा मरत आहेत. भारतात का न मराव्यात?'' शांता म्हणाली.

''शांते, मी विश्वभारतीत जात आहे. मी परत येईपर्यंत नको पडू फंदात. आपण दोघं चळवळीत पडू. मुकुंदराव मार्ग दाखवतील.'' रामदास म्हणाला.

''भाऊ, तू जा. तिकडील त्याग, मरणाची बेपर्वाई इकडे घेऊन ये. बंगाली वीर ! हसत हसत ते शेकडो फाशी गेले. शेकडो अंदमानी खितपत पडले. शेकडो कारागृहात झिजून क्षयी झाले. वंगभूमी, तुला कोटी कोटी प्रणाम.'' शांतेने भक्तिमय प्रणाम केला.

''चला, आपण जाऊ; बाहेर अंधार पडू लागला.'' मुकुंदराव म्हणाले.

''अंधारातून प्रकाश दिसत आहे.'' शांता म्हणाली.

« PreviousChapter ListNext »