Bookstruck

क्रांती 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'मायेचा पसारा.'' तो म्हणाला.

''पसारा म्हणजे काय?'' मायेने विचारले.

''तू का मराठी शिकतेस?'' मुकुंदरावांनी प्रश्न केला.

''हो. हे शिकवतात. महाराष्ट्राचं हृदय आपलंसं करायचं असेल तर भाषा नको का शिकायला?'' तिने विचारले.

''तू याच्याजवळ शिकतेस. परंतु तू याला काही शिकवतेस का? का याला वेडा करणार?'' मुकुंदराव म्हणाले.

''पुष्कळ शिकवणार आहे यांना. आताच जरा नीट बसा, सारखं हलू नका, थोडं, हसरं तोंड ठेवावं, किती तरी शिकवीत होते. महाराष्ट्रीय माकडांना नीट कसं बसावं, नीट कसं हसावं हेही कळत नाही. शेवटी दोन्ही हातांनी धरून यांना नीट बसविलं, यांची मान नीट ठेवली. खूप शिकवीन यांना.'' माया म्हणाली.

''बघू दे चित्र.'' मुकुंदराव म्हणाले.

''पहिलं-वहिलं चित्र पाहू नये हो. दृष्ट पडते.'' ती म्हणाली.

''आजच का चित्रकलेचा श्रीगणेशा?'' त्यांनी विचारले.

''तसं नाही. मी काढलेलं यांचं हे पहिलं चित्रं.'' ती म्हणाली.

''परंतु दाखवायला काय हरकत आहे? खर्‍या रामदासांचं आहे की रामदास माकडाचं आहे ते पाहू दे.'' ते म्हणाले.

''हे का असे माकड आहेत?'' तिने विचारले.

''कोणी बनवलं तर बनतीलही. ध्येयाला विसरणारी माणसं म्हणजे माकडं.'' मुकुंदराव गंभीरपणे म्हणाले.

''माया तू जा. फाडून टाक ते चित्र.'' रामदास म्हणाला.

''जाणार नाही व चित्रही फाडणार नाही.'' ती म्हणाली.

रामदास चित्र ओढू लागला. माया संतापली.

''खबरदार, दंगामस्ती कराल तर ! मी तेजस्वी वंगकन्या आहे. फाडू नका माझं हृदय. कुस्करू नका माझ्या भावना. महाराष्ट्रीय दगडाला बंगालचा ओलावा लागू दे.'' ती म्हणाली.

रामदास स्तब्ध राहिला. कोणीच बोलेना. पुन्हा माया उसळली.

''एखाद्या तरुणाचं चित्र काढणं म्हणजे का पाप? आपल्या आवडत्या वस्तूचं चित्र काढणं का पाप? तुमच्या हृदयात नव्हतं का कधी कोणाचं चित्र, तुमच्या हृदयाच्या दिवाणखान्यात नाही का कोणाची तसबीर? तुम्हाला पाहून नव्हतं का कोणी नाचलं? नव्हतं का कोणी हसलं? तुम्ही जवळ नाही असं पाहून नसेल का कधी कोणी रडलं? आम्हा तरुणांचा का तुम्हाला हेवा वाटतो? पवित्र गुरुदेव येथे आहेत. त्यांच्या हृदयाला धक्का लागेल असं आम्ही कधी काही करणार नाही, ही खात्री बाळगा. पावित्र्याची मर्यादा आम्ही पाळतो.''

« PreviousChapter ListNext »