Bookstruck

क्रांती 45

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''उषःकाली फुलू पाहणारी कळी किती पवित्र दिसते ! ती हळूच हसते व आपल्या अंतरंगातील सौंदर्य व सौरभ विनयानं वर मान करून त्या सूर्यनारायणाला अर्पण करते. मानवी हृदयात प्रेमाची कळी हळूहळू वाढत असते, व्यक्तिनिरपेक्ष अशी ती वाढत असते. 'मी कोणत्याही अंधारात गूढपणे दिवसेंदिवस वाढत आहे. टपोरी होत आहे,' हे त्या कळीलाही माहीत नसतं. परंतु जिच्यासाठी ती कळी वाढत असते, ती व्यक्ती एक दिवस येते, तिचं दर्शन होतं व ती कळी आपला विकास त्या व्यक्तीच्या चरणी वाहून धन्य होते. तरुणांच्या जीवनात उमलू पाहणारी ती कळी पवित्र असते. ती कुस्करू नये, तिचा तिरस्कार करू नये. तिला आशीर्वाद द्यावा, तिचे मंगल व शुभ चिंतावं.'' पुन्हा सारी स्तब्ध बसली.

शेवटी मुकुंदराव म्हणाले,''रामदास, आज मी जाण्याचं निश्चित केले आहे, जपून राहा. सावध राहा. दरिद्री नारायणाची सेवा करावयाची आहे हे भुलू नकोस. ती आठवण असली म्हणजे सारं सुंदर होईल.''

''मी तुम्हाला बोलले, मला क्षमा करा.'' स्फुंदत स्फुंदत माया म्हणाली.

''माझा तुम्हास आशीर्वाद आहे माया. माझ्या हृदयाच्या दिवाणखान्यातही तसबिरी होत्या. तसबिरी लावण्याचं कोणी पवित्र प्रेमानं प्रयत्नही केले. परंतु त्या सर्व तसबिरीवर माया, मी पडदे सोडले. माझ्या हृदयात आता एकच तसबीर आहे. ती माझ्या उपाशी भारतमातेची. माया, गुलामगिरीची, अन्नान्नदशेची, घटोत्कचाची माया दूर करावयाची आहे हे तूही विसरू नकोस, दुसर्‍याला विसरू देऊ नकोस.'' तिच्या मस्तकावर हात ठेवीत मुकुंदराव म्हणाले.

माया मंदमधुर हसली. अश्रूतून हास्य बाहेर आलं. धुक्यातून कोमल किरणं पसरली. गोड भावनांची बंद झालेली कारंजीर पुन्हा नाचू लागली. उडू लागली.

'रडलीस, लगेच हसलीस. खरी बंगाली आहेस.'' रामदास म्हणाला.

''रडवलंत, लगेच हसवलंत. खरे कठोर महाराष्ट्रीय आहात.'' माया म्हणाली.

''मला मघाशी बंगाली वाघीणच वाटलीस.'' रामदास म्हणाला.

''मला तुम्ही लुटारू मराठे वाटलेत.'' माया म्हणाली.

''माया आपल्या पंजांनी रामदासला पकडून ठेवणार व रामदासही मायेचं हृदय चोरून लुटणार. एक वाघीण तर दुसरा लुटारू चोर.'' मुकुंदराव हसून म्हणाले.

''आता आज एवढेच चित्र पुरे. मात्र पुन्हा मी सांगेन तेव्हा सांगेन तसे बसले पाहिजे; सांगेन तशी मान ठेवली पाहिजे; सांगेन तितकंच हसलं पाहिजे. आहे कबूल?'' मायाने विचारले.

''कबूल, एकदम कबूल.'' रामदास म्हणाला.

''चला, आपण यांचं सामान बांधू.'' ती म्हणाली.

''माझी अडगळ एकदा लवकर फेकून द्या.'' मुकुंदराव हसत म्हणाले.

''आता पुन्हा रडवू नका हं.'' माया म्हणाली.

''कोणी रडवू लागला, तरी रडायचं नाही ही महाराष्ट्रीय कला थोडी शीक.'' मुकुंदराव म्हणाले.

''हळूहळू शिकेन. घाई नको, उल्लूपणा नको. करील कोणी घाई तर सारे फुकट जाईल. कळी घाईने फुलवली तर रंग दिसणार नाही. गंध दरवळणार नाही.'' माया म्हणाली.

« PreviousChapter ListNext »