Bookstruck

क्रांती 52

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''का बरं?'' त्याने विचारले,

''शिकायला पैसे लागतात. गोविंदराव अतःपर पैसे देण्यास तयार नाहीत. वडील म्हणतात, त्या एका श्रीमंत कुत्र्याजवळ लग्न कर. भाऊजवळ पैसे मागेन तर त्याचं अलीकडे पत्रही नाही. मी मनात म्हणत असे, 'डॉक्टर होऊन येईन. खेडयातून सेवा करीत हिंडेन. सारं मनातल्या मनात -'' ती म्हणाली.

''शांता, तू शीक; मी देईन पैसे. माझे पैसे नाहीत चालणार?'' त्याने विचारले.

''तू कोठून देणार पैसे? तुझे वृध्द आईबाप आहेत. मोलमजुरी करून तू किती पैसे मिळविणार, त्यातील कितीसे उरणार?'' ती म्हणाली.

''शांता, पुन्हा लग्न करावयाचं या विचारानं मी पैसे साठवीत असे. ते आहेत थोडे मजजवळ.'' तो म्हणाला.

'लग्नासाठी पैसे तुला कशाला?'' तिने विचारले.

''मला कोणी मुलगी आता देत नाहीत. मुलगी दिली की मरणार असं मुलीच्या आईबापांना वाटतं; तरीही एखादा गरजू बाप भेटला तर द्यावे त्याला पैसे व करावं लग्न असं मनात येई.'' तो म्हणाला.

''ती मुलगी मरेल याचं तुला काही वाटत नसे?'' तिने विचारले.

''मजजवळ लग्न न करणार्‍या सार्‍याच अमर होतील का?'' त्याने विचारले.

''मग आज मिळाली वाटतं गरजू मुलगी. घेणार तिला विकत?'' शांता हसून म्हणाली.

''काय बोलतेस हे? शिकणार्‍या लोकांना हृदय नसतं.'' तो म्हणाला.

'माझ्याजवळ शिकून तुझं हृदय मेलं का फुललं?'' तिने विचारले.

''मग घेशील ना माझे पैसे. निढळाच घामाचे पवित्र पैसे !'' तो म्हणाला.

''ते पैसे किती दिवस पुरणार?'' ती म्हणाली.

''मी मिलमध्ये नोकरी करायला जाऊ? मला मिळणार होती मिलमध्ये नोकरी. परंतु तू गावात शिकवण्याचं काम दिलंस. गुरूचं ऐकलं पाहिजे.'' तो म्हणाला.

''तू मिलमध्ये नोकरी करून मला पैसे देणार?'' तिने विचारले.

''मी परका नसेन तर ते घ्यायला काय हरकत? शिकून ये, खेडोपाडी पेटव. मग किसान-कागार पेटव.'' तो म्हणाला.

''मी एकटी कशी पेटवू?'' तिने विचारले.

''मुकुंदराव येतील, रामदासभाऊ येतील, किती तरी येतील !'' तो म्हणाला.

''आणि तू?'' तिने विचारले.

''तू असलीस म्हणजे मी का दूर आहे? तू म्हणजे मी व मी म्हणजे तू.'' तो म्हणाला.

« PreviousChapter ListNext »