Bookstruck

क्रांती 53

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मोकळया हवेत राहणारा तू. मिलमध्ये जाऊन आजारी पडशील. तुझ्या तोंडावरचं हे तेज मावळेल.'' ती म्हणाली.

''तोंडावरचं मावळेल. परंतु हृदयात त्यागाचं व प्रेमाचं फुलेल. खेडयातील मोकळी हवा मिळणार नाही. परंतु गोड प्रेमाची हवा जीवनात सुटेल. शेवटी माणसाला प्रेमाची भाकर, प्रेमानं हवापाणी हेच अधिक मानवतं. आत्मा त्यावरच पुष्ट होतो.'' तो म्हणाला.

''परंतु तो आत्मा शरीराशिवाय राहू शकत नाही. शरीरात राहूनच आत्मा प्रेम चाखू शकतो.'' ती म्हणाली.

''शांता, तू अधिक शिकलेली. मला वाद करता येत नाही. तू जा; शीक. खूप शीक. मी नोकरी करीन, काहीही करीन. तुला पैसे पाठवीन. तू पुढे किसान-कामगारांसाठी लढणार. किसान-कामगारांनी तुला मदत केली पाहिजे. आम्ही तरुण तुला मदत करू.'' तो म्हणाला.

''तू जा मोहन. तुला मोट चालवायची असेल.'' ती म्हणाली.

''जातो; पण शेवटचं सांगतो की शीक. रडू नको. मी मोट सुरू करायला जातो. परंतु तू तुझी मोट सुरू करू नको.'' तो म्हणाला.

''जीवनाचा मळा पिकण्यासाठी या मोटेचीही जरूरी आहे. हृदयाच्या आडातील खोल खोल पाणी. तेथे रोज मोट चालवू तर थकून मरून जाऊ. परंतु सटीसामासी ती मोट चालवावी लागते. त्यामुळे आडातील पाणीही निर्मळ राहतं. जीवनही हिरवं दिसतं.'' ती म्हणाली.

''जाऊ मी?''

''जा, तुझ्या शेताचा मालक रागीट आहे.''

''माझ्या शेताचा मालक प्रेमळ आहे, गोड आहे.''

''जा. लौकर, शेताचा मालक येथे येईल व शिव्या देईल.''

''मालक येथेच आहे, जवळच आहे.''

''कोठे रे आहे लबाडा ?''

''हा माझ्यासमोर !''

''वेडा आहेस मोहन !''

''परंतु तू शीक व शहाणी हो. शांता तू शीक.''

« PreviousChapter ListNext »