Bookstruck

क्रांती 139

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''माझ्यावर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही सर्व दूर राहा. शांतपणे जे काही होईल ते पाहा. आपणाला शिव्या देण्याची जरूरी नाही. मला ओढीत फरफटत नेऊ दे. ते मला पाहिजे आहे.''मुकुंदराव म्हणाले.

गुमास्ता जरा गोंधळला. परिस्थिती कदाचित अधिकच बिकट होईल हे त्याने हेरले. त्याने बरोबरच्या सरकारी लोकांस दूर बोलावून काही खलबत केले. ती सारी मंडळी निघून गेली. हसत, हसत निघून गेली.

परंतु मुकुंदराव का त्या गावी नेहमी राहणार होते? त्यांना सतरा ठिकाणी कामे, सर्वत्र त्यांचे हिंडणे-फिरणे, सर्वत्र प्रचार. एक वेळचे मरण जरा दूर गेले. मरण टळणार होते थोडेच? मुकुंदरावांना अटक होण्याचाही संभव होता.

शेतकरी त्यांच्याभोवती उभे होते. तरुण उभे होते. मुकुंदराव म्हणाले,''तुम्ही जप्ती बघता कशी? शांतपणे प्रतिकार करायला उभं राहावं. आम्हाला मारा व मग आमच्या गावातील शेतकर्‍यांची अब्रू न्या, असं निर्भयपणं सांगावं. शिक्षा झाली तर भोगावी. आपण निःसत्त्व व भितुरडे झालो आहोत. कायदा म्हटलं की आपण घाबरतो. माणुसकीचा कायदा हा सर्वश्रेष्ठ कायदा, तो कायदा आपण पाळू या व त्या कायद्याचा भंग करणार्‍याच्या विरुध्द शांतपणे परंतु अचल निश्चयाने उभे राहू या.''

थोडा वेळ थांबून ते पुढे म्हणाले, ''गावोगांव तरुण मंडळं स्थापा. किसान स्वयंसेवक दल स्थापा. गावात अशी जप्ती आली, लिलाव करायला आले का, शिंग फुंकावे, सर्वांना सावध करावं. पूर्वी पेंढार दिसले की गावात नगारा वाजवीत. त्याप्रमाणे हे इंग्रजी राज्यातील कायदेशीर पेंढार लुटायला आले तर त्याला शांतपणे प्रतिकार करावा. आपण हात उचलू नये, शिवी देऊ नये; परंतु पोलादी भिंत उभी रावी. आमच्या प्रेतांवरून शेतकर्‍यांच्या अब्रूकडे तुम्हाला जावं लागेल असं त्यांना निश्चयी स्वरात सांगावे म्हणजे झाले.''

''तुम्ही जाल देवा व ते राक्षस पुन्हा येतील.'' शेतकर्‍याची बायको येऊन म्हणाली.

''हे तरुण मरायला उभे राहतील.'' मुकुंदरावांनी आश्वासन दिले.

दुपारी मुकुंदराव गावातच होते. तो काही तरुणांनी रामदासला पकडून नेल्याची वार्ता आणली.

''कोणी सांगितलं?'' त्यांनी विचारले.

''ती सरकारी माणसंच बोलत होती. 'त्या रामदासाला पकडलं. आता यांनाही सरकार पकडील. फार चावटपणा  चालवला आहे यांनी.' असं चावडीवर बोलत होते.'' एक तरुण म्हणाला.

''धरपकडीला तयार राहा. मरणाला तयार राहा. भारतीय तरुणांची लवकरच सत्त्वपरीक्षा होईल. तुम्ही कमी ठरू नका. धनगावला कामगारांत असंतोष धुमसत आहे. कदाचित संप होईल. खेडयापाडयांत कोणीही बेकार तेथे संप फोडायला जाणार नाही, अशी गावोगांव तुम्ही तरुणांनी व्यवस्था केली पाहिजे. किसान-कामगार एक. किसानांच्या जमिनी गेल्या व ते मजूर झाले. कामगारांची चळवळ फार पेटली तर इकडून किसानांनीही करबंदीची पेटवावी. सरकारनं कामगारांचा प्रश्न समाधानकारक सोडवावा, नाही तर आम्ही तहशील भरणार नाही, असं निर्धारानं कळवावं. असा रंगत गेला पाहिजे लढा. त्यात तुम्ही सारे पडा. भाग्यावर चढा. किसान होऊ दे बडा.'' मुकुंदराव भरभर बोलू लागले.

« PreviousChapter ListNext »