Bookstruck

क्रांती 138

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

२३. अमर रात्र

त्या दिवशी मुकुंदराव मंगळूर गावी होते. एका गरीब शेतकर्‍याच्या घरावर जप्ती येणार होती. तो सावकार अति निष्ठुर होता. त्याला न्यायनीती माहीत नव्हती. मुकुंदराव त्याला भेटले होते. शेतकर्‍याची सर्व स्थिती त्यांनी त्याला सांगितली होती. परंतु सावकार  नुसता हसला. मेलो तरी चालेल. पण ही जप्ती होऊ द्यायची नाही असे मुकुंदरावांनी मनात ठरविले होते.

त्या शेतकर्‍याच्या दारात ते रामनाम जपत बसले. जप्तीवाले आले. मुकुंदराव त्यांना आत जाऊ देईनात. ते तेथे उभे राहिले.

''अहो, हा कायदा आहे. कायदा आहे तोपर्यंत असंच चालणार. तुम्ही करा क्रांती. बदला कायदे. व्हा दूर. समजूतदार लोक तुम्ही. लोकांचे पुढारी ना व्हायचं आहे तुम्हाला? मग असं करून कसं चालेल?'' कारकून म्हणाला.

मुकुंदराव स्तब्ध होते. पाटील वगैरे त्यांना ओढू लागले. मुकुंदराव प्रतिकार करू लागले.

''अहो, पोरासारखं काय चालवले आहे तुम्ही? ती एक जप्ती नाही झाली म्हणून देशातील लाखो जप्त्या का थांबणार आहेत?'' सावकारांचा गुमास्ता म्हणाला.

''आधी बीज एकले.'' मुकुंदराव म्हणाले.

''तुम्ही निघा येथून सारे. चोर. खबरदार मुकुंदरावांच्या अंगाला हात  लावल तर.'' एक तेजस्वी तरुण पुढे येऊन म्हणाला.

''तुरुंगात जायचं आहे वाटतं?'' पाटलाने विचारले.

''फाशी जायचं आहे.'' तो म्हणाला.

दुसरेही शेतकरी आले. तेथे गर्दी होऊ लागली.

''तुम्ही सारे शांत राहा.'' मुकुंदराव म्हणाले.

''त्यांना शांत राहायला सांगता, आणि तुम्ही येथे आडमुठेपणा करता.'' गुमास्ता म्हणाला.

''कोणाला रे खाटका आडमुठा म्हणतोस?'' धावत येऊन एका तरुणाने विचारले.

« PreviousChapter ListNext »