Bookstruck

राष्ट्रीय मेळा 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मुले एका गावाहून दुस-या गावाला निघाली म्हणजे सारा गाव त्यांना पोचवायला जाई. अशा रीतींने जगन्नाथ, गुणा, बन्सी, नारायण, सारा तालुका हालवू लागले. परंतु या गोष्टी सरकारच्या कानी गेला. मेळे करण्याची मनाई झाली. आतां काय करायचें?

“चला जाऊं सारे तुरंगात.” जगन्नाथ म्हणाला.

“परंतु घरीं रागावतील.” बन्सी म्हणाला.

“आणि शाळा बुडेल ती?” गुणा म्हणाला.

“परत आल्यावर शाळेत जाऊ.” नारायण म्हणाला.

“घेतील का पण?” रामानें शंका घेतली.

“मला वाटते सध्या बंदच करूं या. पुढें दिवाळीच्या सुटींत फिरून जाऊं.” वसंताचे मत पडले.

“त्या वेळेसहि बंदी असली तर?” जगन्नाथने उदासीनपणे विचारले.

“आपण मोठे होऊ तेव्हा हिंडू. तूं व मी भिका-यासारखे हिंडायचे ठरवलेच आहे ना! परंतु सध्या नको. घरी रागावतील. आई बाबा रडतील. आपला प्रयोग यशस्वी झाला. आपण मोठे झाल्यावर सर्व महाराष्ट्रभर जाऊ. सर्वत्र चैतन्य खेळवू. रूढि नष्ट करूं. खरा धर्म आणू. भीति गाडून टाकू. संघटना निर्मू. पण जरा मोठे झाले पाहिजे. जगन्नाथ, तू मोठा हो लौकर म्हणजे मग तू वेगळा होशील. स्वतंत्रपणे सारे करायला मोकळा होशील. खरे ना?” गुणा बोलत होता.

“परंतु त्याचं लग्न आहे ना?”

“केव्हा?”

“पुढल्या वर्षी.”

“पुढल्या वर्षी म्हणजे दिवाळीनंतर सहा महिन्यांनी.”

“जगन्नाथ होईल संसारी. मग का या कामात तो पडेल? त्याला लाज वाटेल. तो सावकारी करील. तो का मग सावकारी नष्ट करा असे सांगणारे मेळे काढील? तो का अशा नाटकांतून काम करील?

“मी माझ्या जीवनाचेच नाटक करीन. प्रत्यक्ष संसारांतच कर्जरोखे फाडून टाकीन. जे नाटकांत करतो ते कृतीत करून दाखवीन. या संवादांचा, या मेळ्यांचा लोकांवर काय परिणाम झाला असेल ते लोकांना माहीत, सरकारला माहीत. परंतु माझ्या मनावर त्यांचा चिरस्थायी परिणाम झाला आहे. मी सारे प्रत्यक्ष करून दाखवीन.

“बरे पाहूं.”

“बरें बघा.”

शेवटी मेळा खांबला. सुटीहि संपली. शाळा सुरू झाली. परंतु गुणा व जगन्नाथ यांच्या मनांत पुढचे विचार होते. संवादातील गाणी व शब्द  त्यांच्या कानांत गुणगुणत होते. भविष्याकडे बोट दाखवीत होते

« PreviousChapter ListNext »