Bookstruck

जगन्नाथचे लग्न 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दसरा दिवाळी गेली. तुळशीचें लग्न लागलें तयारी सुरू झाली. ते वास्तविक मागील वर्षीच व्हायचें, परंतु काही कारणामुळे राहिले. गदागदागिने घरांत होतेच. मागील वर्षीच नवीन करून ठेवण्यात आले होते. एक मनुष्य येवल्यास गेला. तेथून पैठण, पितांबर वगैरे कापड समक्ष पाहून घेऊन आला.

शिरपूरची मुलगी होती. सोयरिक कधीची ठरली होती. मुलीचे आईबाप नव्हते. भाऊ होते. वडील भाऊ सारे पाही. मुलगी मोठी झाली, करून टाका एकडा लग्न, असा त्याचा सारखा आग्रह चालला होता. जगन्नाथ नको म्हणत होता. परंतु आईच्या आश्रूंपुढे तो गप्प बसे. त्याच्यावर त्याच्या आईचे फार प्रेम. त्या घरात बाकी कोणाला तो आवडत नसे. परंतु आई त्याचे कौतुक करी. प्रेममूर्ति आईचे मन दुखवणे जगन्नाथच्या जिवावर येई.

“आई, खरोखरच लग्न करूं नये असे मला वाटते.” तो म्हणाला.

“लग्न म्हणजे का वाईट वस्तु आहे बाळ? लग्नाशिवाय का कोणी राहतो? आज ना उद्या करायचेच ना? लग्न म्हणजे शुभ व मंगल वस्तु. एखाद्याचें लग्न लावणें म्हणजे मोठी धार्मिक गोष्ट मानतात.” आई म्हणाली.

“आई, मी म्हणतों तसे कराल लग्न?

“म्हणजे कसें?”

“साधें लग्न. वरात नको, काही नको. मिरवणुकी नकोत. रास न्हाणीं नकोत. मला नाहीं त्या गोष्टी आवडत.”

“अरे, आमच्यासाठीं कर. थोंडे काही इतरामसाठी करावे. सारे का स्वत:चेच चालवायचे? स्वत:चाच का सारा हट्ट? आणि वरात असली म्हणून काय बिघडते?”

“आम्हांला का आतां खांद्यावर घेऊन नाचणार? मी का कुकुलें बाळ आहे आई?”

“मग किती रे मोठा झालास? अजून वीस वर्षाचाहि नाहीस. १८ वर्ष नुकती झाली. लहान नाही तर काय? अरे झाल असते. वधूवरांस खांद्यावरून नाचवतात. तीं दोघे एकमेकांवर गुलाल उधळतात. गंमत असते. वधूवरे जणु परस्परास प्रेमाने रंगवितात.”

“ज्यांनी एकमेकांस कधी पाहिलेहि नाही, तेथे कुठचे प्रेम? काही तरी आहे. आमचे लग्न आणि तुमचे खेळ.”

« PreviousChapter ListNext »