Bookstruck

जगन्नाथचे लग्न 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“जगन्नाथ, तूं माझे सारे ऐक. उगीच हट्ट नको करू.”

“आई, माझे एक म्हणणे तरी ऐकाल?”

“कोणते?”

“मी सारा खादीचा पोषाख करीन. लग्न म्हणजे मंगल वस्तु. त्या वेळेस तरी गरिबांच्या हातची पवित्र वस्तु जवळ असू दे.”

“अरे सा-या वस्तु गरीबच करतात. रेशमी कपडे झाले म्हणून ते का श्रीमंत विणतो?”

“खेड्यापाड्यांतील गरिबांना ज्यामुळे घास मिळतो, ती गोष्ट अधिक पवित्र. खादी बेकारांना काम देते, निराधारांना आधार देते. आई, या बाबतींत मी कोणाचेच ऐकणार नाहीं. माझ्यासाठी कपडे कराल ते खादीचे करा. मी डोक्यावर पगडी, पागोटे काही घालणार नाही. साधी गांधी टोपी घालीन.”

“ती दोन आण्यांची गांधी टोपी?”

“ती कोटि रुपयांची गांधी टोपी. ज्या टोपीला गांधीजींचा आशीर्वाद आहे, जिला त्यांचे नाव मिळाले, ती का दोन आण्यांची? सर्व हिंदुस्थानचे भाग्य मला तीत दिसते. आई, ते काही नाही. गांधी टोपी, तीहि स्वच्छ पांढरी, त्याच्याशिवाय मी दुसरे काहीहि डोक्यास घालणार नही. अंगावरहि सारे खादीचेच कपडे. तुला सांगून ठेवतो.”

“बरें बाबा. तुझ्या म्हणण्याप्रमाणे. आम्हांला हसू देत लोक. होऊं दे आमची मान खाली.”

“तुमची मान वर होईल. वर्तमानपत्रांत तुमचे नाव येईल. लोकांना उदाहरण होईस. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमची मान खाली नाही हो होणार. विलायती कापड आणाल तर देशाची मान खाली होईल. आणि आई, लग्न लागल्यावर मी कोठे तरी निघून जाईन. तुमच्यासाठी म्हणून लग्नाला उभा राहीन आणि मग जाईन निघून.”

“काही जात नाहीस निघून. लग्न लागले म्हणजे अडकलास. काही भीति नको घालू आम्हांला. कोठे रे जाणार आहेस पळून? जाशील दोन दिवस व येशील पुन्हां घरी.”

“मी खरे ते सांगतो.”


« PreviousChapter ListNext »