Bookstruck

जगन्नाथ 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“आमच्याकडे एक म्हण आहे. सांगू?”

“काय आहे म्हण?”

“गूळ तेथे माशी, व्हेकन्सी तेथे मद्रासी.”

“खरे आहे. आमच्याकडील शाळांतून एकदम संपूर्ण कारकून बाहेर पडतो. शाळेतच शॉर्टहॅन्ड, टाइपरायटिंग शिकवतात. मद्रासी टाइपिस्ट स्टेनोग्राफर हिंदुस्थानभर पसरले. कारकुनी करावी तर मद्राशांनींच, ही कीर्ति आम्ही मिळविली. आमची राहणी कमी खर्चाची. थोडे ताक व भात. कमरेला लुंगी; झाले. परंतु यापुढे निराळे मद्रासी बाहेर पडतील हो. आमच्याकडचे पुष्कळ लोत तिकडे आहेत. तुम्ही एक आमच्याकडे आलांत, तुम्हांला प्रेमाने वागवू दे. मद्रासी दिलदारी तुम्ही मग तिकडे कळवा. आमच्यावर मग कमी रागवाल. खरे ना?”

“काय करावे समजत नाही.”

“मी सांगते ते ऐका हो.” असे म्हणून मंदमधुर हंसत ती गेली.

थोड्या वेळाने जेवणे झाली. भाताला ‘साधन’ शब्द जगन्नाथला फार आवडला. आणि ‘कोळंबो’ म्हणजे आमटी. सीलोनमधील कोलंबो शहर या ‘कोळंबो’ साठी प्रसिद्ध की काय? असे त्याच्या मनांत आले. जेवून तो वर गेला. त्याने कपडे केले.

“येतां का?” कावेरीने विचारले.

“हो.” तो म्हणाला.

“ही लवंग घ्या.” ती म्हणाली.

“नको.”

“लवंगहि नाही खात? ही स्वदेशी लवंग आहे. आमच्याकडे लवंगांचे मळे आहेत हो. कॉफी व लवंगा या आमच्या खास चिजा आहेत.”

“नारळ व तंबाखूहि इकडे फार.”

“आणि तपकीर! मद्रासी तपकीर पंजाबपर्यंत पसरली आहे.”

“मीहि विद्यार्थी असताना भोक्ता होतो. फार तिखट तपकीर. कडक. मी सोडून दिली आतां.”

« PreviousChapter ListNext »