Bookstruck

जगन्नाथ 18

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“तुम्हांला माझ्याबद्दल काही तरी वाटावे म्हणून मी मोठमोठ्या गप्पा मारीत असे. हल्ली विद्यार्थ्यांचा व विद्यार्थीनींचा हा स्वभाव आहे. क्रान्तीची चर्चा करावयाची. त्या चर्चा करतां करतां प्रेमे जडायची. मग संसार थाटायचे. नोक-या करायच्या. एखादी क्रांति क्रांति शब्द असलेली कादंबरी मग वाचायची वा लिहायची. असे सर्वत्र आहे. मी त्यांतलीच एक. मी एक अबलाच आहे. स्त्रीच आहे. प्रेमासाठी तहानलेली स्त्री. स्वत:चे प्रेम कोणाला तरी द्यावे व कोणाचे तरी आपणांस भरपूर मिळावे म्हणून तहानलेली स्त्री. आजपर्यंत माझे ते प्रेम मनांतल्या मनांत गुदमरत होते. तुम्ही त्याला सजीव केलेंत. वठत जाणा-यास पल्ल्व फोडलेत. परंतु तुम्ही विवाहित आहांत. तुमची पत्रे येत जात.”

“परंतु आतां ती बंद पडली.”

“आतां नाही पाठवणार पत्रे?”

“कोणाला पाठवू?”

“तुम्ही फसवे आहांत!”

“आजपर्यंत होतों. आतां फसवणार नाही.”

“म्हणजे काय?”

“मी इंदिरेला लिहीत असे—प्रेमाची पत्रे लिहित असे. परंतु ती वंचना होती. माझे हृदय तुम्हीं व्यापिले आहे. आतां कोणाला पाठवू पत्र?”

“वेडे आहांत तुम्ही. माझे का तुमच्यावर प्रेम आहे? मुळीच नाहीं. तुमची परीक्षा घेतली. नापास झालेत. तुम्ही चंचल आहांत.”

असे म्हणून ती उठून गेली.

जगन्नाथ अशान्त झाला. संगीतांत त्याचे मन रमेना. तो विचार करीत बसे.

“आज तुमचा फोटो काढायचा आहे. एक जण मैत्रीण येणार आहे. या गच्चीत फोटो काढूं.”

“माझा फोटो नको.”

“बसले पाहिजे. तुमचा एकट्याचा काढायचा की आपला दोघांचा?”

“तूं सागशील तसे. तुझी इच्छा प्रमाण.”

“आज एकट्याचाच तुमचा काढूं. पुढे केव्हा तरी दोघांचा काढूं.”

« PreviousChapter ListNext »