Bookstruck

इंदु 30

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी गुणा व इंदु यांचा विवाह झाला.

गुणा परत कलकत्त्यास जावयास निघाला. इंदूने तयारी करून दिली. त्यांचा दोघांचा एकत्र काढलेला फोटो तिने त्याच्या ट्रंकेत ठेवला.

“कुमुदिनीचा फोटो हवा का?” तिने विचारले.

“तो तुझ्याजवळ असूं दे.” तो म्हणाला.

गुणा निघून गेला. इंदु आता गुणाच्या आईबापांकडे राहायला आली. त्यांच्या घरांत काम करूं लागली.

“इंदु, अग तिकडेच राह्यला पाहिजे असे नाही काही.” तिची आई म्हणाली.

“आई, आता त्यांच्याजवळच राहणे बरे.”

“आपला रामा तिकडे येत जाईल. भांडी घाशीत जाईल, धुणी धूत जाईल.”

“नको आई. मीच सारे करीन. त्यांना त्यांत कमीपणा वाटेल. संकोच वाटेल. ते लाजवल्यासारखे होईल. तुम्ही गडी पाठवाल तर तो माझ्यासाठी असे होईल. आजपर्यंत नाही पाठवलात तो? आतांच का पाठवणार?”

“आणि आजपर्यंत तू नव्हतीस त्यांच्याकडे गेलीस ती? आतांच कां गेलीस?”

“आधीहि गेल्ये असत्ये. परंतु लोक हंसले असते. तुमचे विधि व्हायला हवे होते ना? परंतु आधी रामा पाठवला असता तरी अडचण नव्हती, त्यासाठी विधींची जरूर नव्हती.”

“मला नाही हो समजत इंदु. आम्ही साधी संसारी माणसे. योग्य ते कर. आजारी पडूं नकोस म्हणजे झाले. मागे आजारी होतीस त्यांतून वाचलीस. आतां आजारी पडलीस तर फार वाईट. आतां तू एकटी नाहीस. तुझ्यावर दुस-याचा जीवहि अवलंबून आहे. आमच्यासाठी नाही पण गुणासाठी तरी जप. आमचे आतां वय झाले. परंतु तुमचा संसार तर पुढे व्हायचा. येऊ दे हो रामाला. त्याला दोन रुपये अधिक देऊं.”

“बरे हो आई.”

रामा काम करायला येई. इंदु आतां स्वयंपाक करी. इतर काम करी. सासूसास-यांस कृतकृत्य वाटे.

“इंदु, तू शिकली सवरलेली. तूं का सारे करायचे काम?”

« PreviousChapter ListNext »