Bookstruck

इंदु 32

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इंदूची मन:स्थिति कोण वर्णील? तिच्या शोकाला अंत नव्हता. एका दिवसांत  ती पोरकी झाली. वीस वर्षे आईबापांचे कृपाछत्र तिच्यावर होते. ते एकदम हिरावून नेण्यांत आले. गुणाला रामरावांनी तार केली. गुणा स्तंभितच झाला. तो एकदम इंदूरला यावयास निघाला. शोकमूर्ति इंदूची मूर्ति डोळ्यांसमोर येऊन त्याला सारखे वाईट वाटत होते. मनोहरपंतांची व आपली गाठ कशी पडली. आपणांस त्यांनी बोलाविले, कसे हे सारे योगायोग. आणि लग्न आतां लावूनच जा कसे म्हणाले? त्यांना का पुढचे मरण दिसत होते? हे जीवनाचे कोडे म्हणजे काय आहे? कोणाला हे उलगडेल? हे मनाचे खेळ ही मनाची बिनतारी यंत्रे, कधी यांचा उलगडा होईल? किती गुंतागुंतीचें जीवन. किती खोल गेलेली त्यांची मुळे, किती दूरवर पोचलेल्या शाखा!

विचाराने तो जवळ जवळ वेडा होऊन इंदूरला आला. तो इंदूच्या घरी आला. हळूहळू वर आला. इंदु आपल्या खोलींत खाटेवर शून्य मनाने पडून होती. तिला जबरदस्त धक्का बसला होता. गुणा आला. सामान ठेवून तो इंदूच्या खोलीत गेला. तो त्चायजवळ बसला. ती एकदम उठली व “गेली हो—आई गेली, बाबा गेले. एका दिवशीं गेली. एका दिवशीं. अरेरे! गुणा, एकदम रे कशी गेली?”

“ती रडूं लागली. गुणा काही बोलला नाही. तिने त्याच्या मांडीवर डोके ठेवले. ती मधून मधून बोले व रडे. शेवटी ती शांत झाली.

“उगी हो इंदु.” तो म्हणाला.

“मी आतां तुझी झाल्ये म्हणून का ती दोघे गेली? मी तुझ्याबरोबर एरंडोलला आल्ये असत्ये म्हणून का ती आधीच निघून गेली. आपला मार्ग मोकळा करून देऊन गेली?”

“इंदु, मरण का आपल्या हातचे आहे? बोलावणे आले की जावे लागते.”

“कोणाचे बोलावणे?”

“देवाचें.”

“कोठे आहे तो देव? असा कसा तो देव? त्याने मला एक आधार दिला नाही तो दोन आधार घेऊन गेला. असा कसा कंजुष देव, अनुदार देव!”

गुणाचे डोळे भरून आले. काय बोलणार तो?

« PreviousChapter ListNext »