Bookstruck

*कलिंगडाच्या साली 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मंगळ्यानें धांवून धनजीशेटच्या थोबाडींत मारली. बाकीचे घाबरले. त्यांनीं मंगळ्याला आंवरले, शुक्री धांवून आली ती संतापून म्हणाली, “कां त्यांना आवरतां? त्या पापी चांडाळाचे डोळे फोडूं दे त्यांना. सोडा त्यांना हा शेट म्हणजे मांग आहे मांग.”

इतक्यांत शिट्या आल्या. पोलिस बंदूक घेऊन येत होते. लाला होता. आदिवासी पळाले. पोलिस का गोळीबार करणार ? का पकडणार ? सारे आपापल्या झोंपड्यांत जाऊन बसले. धनजी पोलिसांना सामोरा गेला. त्यांना तो तिखटमीठ लावून हकीगत सांगत होता, त्यांना घेऊन तो आदिवासींच्या हंगामी झोपड्यांकडे आला.

“आधी याला पकडा, हा माझा खून करणार होता. बायकोलाहि हाच मारतो. हाच मुख्य आहे. हाच आग लावणारा.” धनजी मंगळ्याकडे बोटें करून म्हणाला. पोलिसांनीं त्याला हातकड्या घातल्या.

“मलाहि पकडा. मी कशी राहूं ?”
“तूं माझ्या बंगल्यावर काम कर. घाबरूं नको.” धनजी म्हणाला.
“शेण पडो तुझ्या तोंडांत !” ती म्हणाली.
“गप्प” एक पोलिस म्हणाला.
“तुम्हांला येथें काम करायचें कीं नाहीं ? अधिकार्‍यानें विचारलें.
“ठरल्याप्रमाणें आधी मजुरी द्या.”
“ते देतील ती मजुरी घ्या.”
“आम्ही घेणार नाहीं.”
“मग चालते व्हा येथून.”
“हे चाललों. याद राखा मात्र.”
“इंग्रजांचे राज्य आहे अजून. आग विझवूं आम्हीं.”

ते आदिवासी गेले. पोलिसांनीं दोघाचौघांना पकडलें. मडकीं, गाडगीं घेऊन ते आदिवासी निघाले आणि गांवोगांव बातमी गेलीं. सर्वत्र संप सुरू झाला. गवताला कोणी हात लावीना. कापलेलें बांधीना. पाऊस पडला तर आधींच कमी असलेलें गवतहि नाहींसें होईल. कापून बांधलेलें गवत घेण्यासाठीं बैलगाड्याहि मिळेनात. कांहीं ठिकाणी आगी लागल्याच्याहि बातम्या आल्या.

जमीनदार. गवताचे व्यापारी, हेहि स्वस्थ बसले नव्हते. पठाणांना हाताशीं धरून पोलिसांना हाताशीं धरून एकदम एखाद्या गावीं ते जात. तुला पैसे दिले होते, कामाला येतोस कीं नेऊं पकडून अशा धमक्या येत. पोलिस, पठाण मारहाण करीत.

« PreviousChapter ListNext »