Bookstruck

*कलिंगडाच्या साली 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तिच्या पोटांत तिसरे प्रहरी कळा येऊं लागल्या. ती तेथे विव्हळत होती. जवळ कोणी नाहीं. बाळ जन्मणार! एका आजीबाईला तिनें सारे विचारून ठेवले होतें. बांबूचा चाकू करून तिनें ठेवला होता. ती कण्हत होती. श्वास दाटे. जवळ कोणी नाही. तिकडे झाडावर वटवागळे आवाज करीत होती आणि लांब कुत्रा भों भों करीत होता. शुक्रीचे लक्ष प्रसूतीकडे होतें आणि बाळ जन्मलें ! गोरें गोरें बाळ ! शुक्रीनें किंकाळी फोडली. तिने तें बाळ तेथेंच टाकलें. ते आरडू लागलें !

आजचा तिसरा दिवस ! रात्रीची वेळ आहे. शुक्री उठली आहे; तिनें हातांत काहीं तरी घेतले आहे. कुSठें जात आहे ती ? ती थरथरत होती. एकाएकी तिच्या हांतून कांही तरी खालीं पडले. काय आहे तें ? तें सप्राण आहे की निष्प्राण आहे?  ना आवाज, ना रडणें, तें मूल का सजीव नाहीं ? त्याच्या गळ्याला का कोणी नख लावलें ? शुक्री काय केलेंस तूं ?

इतक्यांत कोणी तरी येत आहे असें तिला वाटलें. ती घाबरली. बॅटर्‍यांचा उजेड पडला. पोलिस होते. ती खालीं वाकलीं. ते जवळ आले.

“कोण आहे?” कोणी दरडावलें.
शुक्री रडूं लागली. पोलिसांनीं तिला घेरलें.
“कोण आहेस तूं? रडतेस कां?”
“बाळ गेला माझा.”
पोलिसांनीं त्या फडक्यांतलें मूल पाहिलें. हें मृत मूल ! गोरें गोरें पान मूल!! पोलीस चकीत झाले!
“कोणाचें हें मूल?”
शुक्री बोलेना, ती रडत होती, थरथरत होती.
“अग, कोणाचं हें मूल ?”
“माझं.”
“तुझं मूल असं गोरं गोरं ? तुझा नवरा का गोरा आहे ?”
“हें मूल माझं;  पण माझं नव्हे.”
“काय आहे ही कथा ?”
“धनजीशेटना विचारा.” ती रडूं लागली.
“तूं हें मूल मारलेस. खरं कीं नाहीं ?”

« PreviousChapter ListNext »