Bookstruck

प्रकरण ५ : युगायुगांतून 81

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

या प्रश्नाचे उत्तर प्रोफेसर हॉग्बेन याने पुढीलप्रमाणे सुचविले आहे.  ''हिंदूंनाच हा शोध का लागला आणि प्राचीन गणितज्ञांना का लागला नाही, व्यवहारी माणसांनीच या दिशेने पाऊल का टाकले हे समजून घ्यायचे असेल तर काही अद्वितीय बुध्दीनेच लोक जगाची बौध्दिक प्रगती करीत असतात ही कल्पना सोडून दिली पाहिजे.  ही कल्पना आपण जर न सोडू तर वरील प्रश्नाचे उत्तर मिळण्याच्या बाबतीत अडचणी अधिकच कठीण होतील, वाढतील.  कितीही अद्वितीय बुध्दिमत्तेची व्यक्ती असो तिच्या भोवतीच्या माणसांच्या अंगवळणी पडलेली एक विशिष्ट समाजव्यवस्था असते व त्या वैयक्तिक बुध्दीला ह्या सामाजिक व्यवस्थेची मर्यादा पडलेली असते, त्यापलीकडे ती बुध्दी जाऊच शकत नाही.  म्हणून बौध्दिक प्रगतीचे कारण या समाजव्यवस्थेतच शोधले पाहिजे.  ख्रिस्त शकाच्या पहिल्या शतकात हिंदुस्थानात गणितविषयक शोधांच्या बाबतीत जे हे झाले तसे पूर्वीही झाले होते, आणि सोव्हिएट रशियात आज ते होतही असेल.  हा सत्य सिध्दान्त आपण मानला तर आपण त्याचा निष्कर्ष हा मानला पाहिजे की, प्रत्येक संस्कृतीत तिचे मरणही असते.  कोणतीही संस्कृती असो, ती विशेष बुध्दिमंतांच्या शिक्षणाकडे जितके लक्ष देते, तितकेच लक्ष जर बहुजनसमाजाच्या शिक्षणाकडे देणार नाही तर ती मरेल.''*

म्हणून आपण समजून चालले पाहिजे की हे क्रांतिकारक, जागतिक महत्त्वाचे शोध एखाद्या प्रतिभावान आणि प्रज्ञावान माणसाला मिळालेल्या क्षणैक स्फूर्तीतून लाभलेले नसून आपल्या काळच्या फार पुढे गेलेल्या अलौकिक पुरुषाच्या बुध्दिप्रभेतून निघालेले नसून सामाजिक परिस्थितीतून त्यांचा जन्म झालेला आहे; तत्कालीन आवश्यक अशा गरजेतून ते जन्माला आले आहेत.  जनतेची, समाजाची अत्यंत आवश्यक अशी गरज भागविण्यासाठी, पुन:पुन्हा केलेली मागणी पुरविण्यासाठी अपूर्व प्रज्ञेचा मनुष्य लागतो यात शंका नाही; परंतु मागणीच जर नसेल तर ती पुरी करण्याची प्रेरणा प्रज्ञावंताला होणार नाही आणि जनतेला जरूर नसेल तर शोध करूनही तो फुकट जाईल.  त्या शोधाच्या उपयोगासाठी अधिक अनुकूल परिस्थिती प्राप्त होईपावेतो तो शोध पडूनच राहील.  गणितावरील प्राचीन संस्कृत ग्रंथांवरून अशी मागणी होती हे दिसून येते; कारण
------------------------
*     हॉग्बेनच्या 'लाखोंसाठी गणित' या पुस्तकातून घेतलेला उतारा.  (लंडन, १९४२), पृष्ठ २८५.

गणितशास्त्रविषयक या ग्रंथातून व्यापार, देवघेव, सामाजिक संबंध, ज्यांत गुंतागुंतीचे हिशेब वगैरे आहेत त्या सर्वांचे पुन:पुन्हा उल्लेख आहेत.  कर, कर्ज, व्याज यासंबंधीचे प्रश्न त्यात आहेत; भागीदारीचे प्रश्न, अदलाबदलीचे प्रश्न, विनिमयाचे प्रश्न, सोन्याचा कस पाहण्याचा प्रश्न इत्यादी शेकडो प्रश्न त्यातून दिसून येतात.  समाज आता प्रगल्भ व गुंतागुंतीचा झाला होता; सरकारी कामकाज व व्यापार सर्वत्र पसरला होता.  त्यात कितीतरी लोक गुंतले होते.  हिशेबाच्या सोप्या, सुटसुटीत पध्दतींचा शोध लागल्याशिवाय हे सारे चालणे कठीण होते, अशक्य होते.

« PreviousChapter ListNext »