Bookstruck

शशी 18

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शशी : मास्तर, ‘गद्धा,’ ‘गाढव’ म्हणजे शिव्याच का?

गुरुजी : हेही का बैलोबा, तुला कळत नाही? अरे शिव्याच त्या!

शशी : मग तुम्ही देता त्या?

गुरुजी : अरे, हे लहान मुलांसाठी पुस्तक आहे. मोठ्या माणसांनी शिव्या दिल्या तरी चालतात. समजलास? गप्प बस आता. सारी कविता संपवायची आहे. “शिवी कोणा देऊ नये,” शिवी म्हणजे काय? अपशब्द. गोंद्या, फळ्यावर लिही. ब्द-अरे ब ला द. अजून जोडाक्षर येत नाहीत! “इकडे ये,” गोंद्याला एक झणझणीत बसली. आणि भांडण काय? तंटा, कलह. घ्या लिहून. शशी, तू लिही फळ्यावर. टंटा नव्हे, शुंभा! तंटा. तंट्याच्यापढे स्वल्पविराम कर आणि कलह असे लिही. अस्से, बस जाग्यावर.”
“आता भूगोलाचा तास आहे ना रे ? भूशिर, आखात, द्वीपकल्प यांच्या व्याख्या पाठ करुन आला की नाही ?”

मुले
: आज बुधवार. मास्तर, आता गोष्टीचा तास. गोष्ट सांगा.

मास्तर : आज बुधवार की गुरुवार ?

मुले : बुधवार, गोष्ट सांगा.

मास्तर
: नेहमी रे किती गोष्टी सांगायच्या ? आज नको गोष्ट.

शशी : मी सांगू गोष्ट ?

मास्तर : तू रडूपंत काय सांगणार ? येते का एखादी तरी ?

शशी : हो, किती तरी येतात ! मी सांगू ?

बाळ शशी गोष्ट सांगू लागला :
एक होता गाव. तेथे एक मुलगी होती. तिचे नाव सोनसाखळी. सोनसाखळीला सावत्र आई होती. ती तिचे हाल करी. तिला नीट खाऊ घालीत नसे. आंथरा-पांघरायला देत नसे. एकदा सोनसाखळीचा बाप कोठे दूर जाणार होता. सोनसाखळी रडू लागली. बाप म्हणाला, “रडू नको. तुला मी खेळणी आणीन. सुंदरशी, सुंदरशी बाहुली आणीन.” नंतर तो बायकोला म्हणाला, “सोनसाखळीला जप, तिला बोलू नको, मारू नको; आईवेगळ्या पोरीला छळू नको.” बायको म्हणाली, “तुम्ही जा. मी सोनसाखळीला कुशीत निजवीन, न्हाऊ-माखू घालीन, गुरगुट्या भात तिला वाढीन, लोणीसाखर खायला देईन. जा तुम्ही.”

« PreviousChapter ListNext »