Bookstruck

शशी 19

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बाप गेला. सोनसाखळीचे हाल सुरू झाले. त्या सावत्र आईने तिच्या हाताला डाग दिला. हात पुरीसारखा फुगला ! सोनसाखळी रडे. एके दिवशी त्या सावत्र आईने सोनसाखळीस मारून टाकले. तिचे तुकडे तिने पुरले व त्यावर डाळिंबाचे झाड लावले.

बाप परत आला, तो सोनसाखळी नाही! त्याला वाईट वाटले. ते डाळिंबाचे झाड त्याने पाहिले. त्याला ते फार आवडले. तो त्या झाडाजवळ आंघोळ करी. त्या झाडाची पाने कुरवाळी, झाडाकडे बघे. पुढे झाडाला एक फूल आले-एकच फूल! लाललाल होते. त्याचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता ते फळ घागरीएवढे झाले! बापाला आश्चर्य वाटले. सारा गाव ते फळ पाहण्यासाठी येई.
पुढे ते फळ पिकले. ते बापाने तोडले. त्याचे मित्र जमले होते. फळ फोडणार तो फळातून आवाज आला. “हळूच चिरा, मी आहे हो आत! हळूच चिरा, मी आहे हो आत!” बापाने शब्द ओळखला. “हा सोनसाखळीचा आवाज!” तो म्हणाला. ते डाळिंब फोडंण्यात आले. आतून सोनसाखळी बाहेर आली, तिने बापाला मिठी मारली. “बाबा, बाबा! मला सोडून पुनः जाऊ नका. हा बघा आईने दिलेला डाग!”

सोनसाखळीची हकीगत ऐकून सारे रडले. बापाने बायकोची खरडपट्टी काढली. तो तिला घालवून देणार होता; परंतु तिने शपथ घेतली आणि ती म्हणाली, “मी असे पुनः मारणार नाही. उतणार नाही, मातणार नाही, वाईट काम पुनः करणार नाही, मी लहान मुलांना मारणार नाही, दुस-यांची मुले माझी मानीन, त्यांच्यावर माया करीन. माझा पहिला अपराध क्षमा करा.”

मग ती राहीली. सोनसाखळी सुखी झाली, तसे आपण सारे होऊ या. इटुकली मिटुकली गोष्ट, सारे व्हा संतुष्ट.
मास्तर : मला थोडे काम आहे म्हणून घरी लवकर जावयाचे आहे. तुम्हीही जा.
“लवकर सुट्टी! ओहो! लवकर सुट्टी!” असे म्हणत मुले नाचत बाहेर पडली.

शशीची आई देवदर्शनाला गेली होती. शशीच्या शाळेची सुट्टी होती. हरदयाळ बाहेरगावी गेले होते. शशी एकटाच घरी खेळत होता. घरामध्ये मांजरी व्यायली होती. मांजरीची पिले सारखी म्याव म्याव करीत होती. त्यांना भूक लागली असेल असे शशीला वाटले. शशीने दुभत्याचे फडताळ उघडले. तेथे रामपात्रात दूध होते. त्याने एक ताट घेतले. त्यात दूध ओतून ते पिलांपुढे ठेवले. पिले दूध पिऊ लागली. शशीला फार आनंद झाला.

इतक्यात शशीची आई आली व तिने पाठीत रट्टा दिला. मांजरीची पिले तृप्त झाली, परंतु शशीला मार बसला.
शशी : आई, त्यांना भूक लागली होती, म्हणून घातले हो दूध.

आई : तुला त्यांनी सांगितले वाटते, भूक लागली म्हणून?

शशी : मधू तरी तुला कोठे सांगतो? तो रडू लागला म्हणजे तू त्याला पाजतेस. म्याव म्याव ही पिलांची भाषा नव्हे वाटते? थोडेसे तर दूध घातले! आपल्याच घरातली ना ती! काय ग वाईट केलं मी? सारीजणे आपली मला मारता!

आई : आणखी चुरूचुरू बोलायला हवं. सारी अक्कल गेली आहे चुलीत! इकडे ये, म्हणजे सांगते काय वाईट केलेस ते!

« PreviousChapter ListNext »