Bookstruck

शिरीष 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘नको ते भाग्य. शिरीषचा वियोग मला क्षणभरही सहन होत नाही. मुक्तापूर राजधानी किती दूर. तेथे जायचे. वर्षभर शिकायचे. मग परीक्षा. नकोच ते. एक क्षणभरही शिरीष जवळ नसेल, तर मी कावराबावरा होतो. मग वर्षभर त्याच्याशिवाय कसा राहू? नको ते प्रधानपद. हे लहानसे घर, ही छोटाशी बाग, हा लहान मळा, पुरे. मी नाही शिरीषचे नाव देणार.’

‘परंतु शिरीष आपल्या गावचे भूषण आहे हे सर्वांना माहीत आहे. अधिका-यांना माहीत आहे. मागे शिरीषने एका भांडणात दिलेला न्याय ऐकून प्रांताधिकारी प्रसन्न झाला होता. तुम्ही शिरीषचे नाव नाही दिले तर राजाच्या कानांवर गेल्याशिवाय राहाणार नाही.’

शेजारी व सुखदेव ह्यांचे बोलणे चालले होते. तो शिरीष तेथे आला.

‘बाबा, तुम्ही सचिंत का?’

‘शिरीष, तू मला सोडून जाशील?’ पित्याने विचारले.

‘शिरीष, राजाचे बोलावणे आले तर जाशील की नाही? राजाची आज्ञा पाळणे हाही धर्मच आहे!’ शेजारी म्हणाला.

‘परंतु ती आज्ञा योग्य असेल तर,’ शिरीष म्हणाला.

‘राजा यशोधर कधीही अन्याय्य गोष्ट करणार नाही.’ शेजा-याने सांगितले.

‘आईबापांपासून एकुलता मुलगा घेऊन जाणे म्हणजे अन्याय नव्हे का?’ सुखदेव म्हणाला.

‘परंतु सर्व प्रजेचे कल्याण व्हावे म्हणून आईबापांनी आपल्या एकुलत्या मुलासही नको का घ्यायला? एकट्याच्या संसारापेक्षा राज्यातील सर्वांचे संसार सुखाचे होणे अधिक श्रेयस्कर नाही का?’ शेजा-याने उत्तर दिले.

‘बाबा, ते काही असो. मी जाणार नाही. तुम्ही माझे नाव देऊ नका. मीही देणार नाही.’ शिरीषने ग्वाही दिली.

‘अरे, तुझे नाव आधीच सर्वत्र गेले आहे.’ असे म्हणून तो शेजारी निघून गेला. दुःखी पित्याची समजूत शिरीषने घातली.

« PreviousChapter ListNext »