Bookstruck

शिरीष 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी शिरीष व करुणा शेतात होती. झाडावर एक पक्षी करुण आवाज काढीत होता.

‘मादीचा नर गेला वाटते कोठे?’

‘का नर मादीला हाक मारीत आहे?’

‘किती करुण आवाज!’

‘शिरीष, तू नाही मला असाच सोडून जाणार? राजाचे मंत्रिपद तुला मोह नाही ना पाडणार? तू गेलास तर मी अशीच ओरडत बसेन. तुझी करुणा रडत बसेल. नको हो जाऊ.’

‘नाही जाणार. तुम्हाला कोणालाही सोडून मी जाणार नाही.’

‘शिरीष, लवकरच आपल्या विवाहाचा वाढदिवस येईल.’

‘यंदा थाटाने साजरा करु. शेजारच्या गावचे गवई बोलावू.’

आणि लग्नाचा वाढदिवस आला. बागेत तयारी करण्यात आली. सुंदर फुले फुलली होती. मध्ये गालिचा होता. रात्री मुख्य जेवण झाले. सुखदेव व सावित्री, शिरीष व करुणा तेथे होती. शिरीषचा मित्र प्रेमानंद तोही तेथे होता. गायन-वादन सुरु झाले. आकाशात चंद्र होता. मंद वारा वाहात होता. फुलांचा परिमळ सुटला होता. आनंदाला भरती आली होती.

‘करुणा, तू म्हण तुझे आवडते गाणे.’ शिरीष म्हणाला.

‘माझा गळा चांगला नाही.’ ती म्हणाली.

‘तुझा गळा मला गोड वाटतो. म्हण!’

आणि करुणेने आढेवेढे न घेता ते गाणे म्हटलेः
‘कर्तव्याचा जीवनात सुगंध
सत्प्रेमाचा जीवनात आनंद।।ध्रु.।।
चिंता नाही माते। सेवा होई माते।
मुक्त आहे जरी संसार-बंध ।। कर्त० ।।
भाग्य माझे थोर। नाही कसला घोर।
प्रभु पुरवी माझे सारे सच्छंद।। कर्त० ।।’

« PreviousChapter ListNext »