Bookstruck

शिरीषचे प्रयाण 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘शिरीष, शपथ रे कशाला! तुझा शब्द मला वेदवाक्य आणि मी कधी तरी त्यांची अवज्ञा केली आहे का ?’

‘तरीही शपथ घे.’

‘घेते हं. उगवत्या सूर्यनारायणा, तू जसा कधी उगवायचा चुकत नाहीस, त्याप्रमाणे मी सासूसास-यांची सेवा करायला कधी चुकणार नाही. तुझी शपथ, जर मी शपथभ्रष्ट झाल्ये तर तू माझे भस्म कर ! झाले ना शिरीष समाधान ?’

इतक्यात घोडेस्वार आले. शिरीष करुणेसह घरी आला. प्रेमानंद बरोबर होता. आईबाप रडू लागले.

‘आई, नको रडू. बाबा, नका रडू. करुणा तुमची काळजी घेईल. सारे मंगल होईल.’ शिरीष म्हणाला.

‘बाळ, पुन्हा कधी रे भेटशील? कधी दिसशील ?’ माता म्हणाली.

‘सुखदेव, सावित्रीबाई रडू नका. शिरीष मोठा होईल. प्रधान होईल. आपल्या गावाचे नाव होईल. शिरीष प्रधान झाल्यावर गावाला विसरु नकोस हो !’ शेजारी म्हणाले.

‘नाही विसरणार. माझ्या आईबापांना सांभाळा. करुणेला मदत करा.’ तो म्हणाला.

‘काळजी नको करु.’ लोक म्हणाले.

आईबापांच्या पाया पडून व करुणेचा आणि प्रेमानंदाचा निरोप घेऊन शिरीष निघाला. तो घोड्यावर बसला. गेले घोडे. शिरीष मागे वळून पाहात होता. गेले घोडे. वा-यासारखे गेले. आपापल्या घरी गेले. सुखदेव व सावित्री घरात आली. करुणा घरात आली. ती रडत होती.

‘करुणे रडू नकोस.’ प्रेमानंद म्हणाला.

‘मी एकंदरीत दुर्दैवीच आहे !’ ती म्हणाली.

‘करुणे, अशुभ मनात आणू नये.’ तो म्हणाला.

‘परंतु येते त्याला काय करु ?’ ती म्हणाली.

‘कर्तव्य करणे एवढे आपले काम.’ असे म्हणून प्रेमानंद निघून गेला.

« PreviousChapter ListNext »