Bookstruck

*राजधानीत 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘हेमा येतेस ना ?’ आदित्यनारायणांनी विचारले. ‘मी नाही येत !’ ती म्हणाली. ‘सा-या राज्यातील तरुण येथे जमले आहेत. तुला कोणता पसंत पडतो बघ. हेमा, तू आमची एकुलती एक मुलगी, तुझे सुख ते आमचे. तू नेहमी लग्न नको असे का म्हणतेस ? तू अशी विरक्त का ?’

‘तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. उद्या माझे लग्न झाले, म्हणजे मला थोडेच येथे राहाता येणार आहे ? तुमचा तर माझ्यावर जीव.’

‘परंतु तुझ्या पतीला घरजावई करीन.’

‘त्यांना न आवडले तर ? त्यांना त्यात मिंधेपणा वाटला तर ?’

‘तुझ्या पतीला येथे मोठी नोकरी लावून देईन.’

‘परंतु त्यांना नको असली तर नोकरी ? येथे राहणे नको असेल तर ?’

‘हेमा, येथे जे तरुण आले आहेत, ते उगीच नाही आले. महत्त्वाकांक्षेने आले आहेत. त्यांना राजधानीत मोठी नोकरी मिळाली तर का आव़डणार नाही ? बुद्धीमान लोक महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या बुद्धीची प्रभा सर्वत्र फाकावी असे त्यांना वाटते. मी तुला एक विचारु ?’

‘काय ?’

‘ह्या जमलेल्या तरुणांत जो पहिला येईल त्याच्याशी तू करशील का लग्न ? जो पहिला येईल त्याला राजा प्रधान करील. म्हणजेच मग तूही येथेच राहाशील. तुझी व आमची नेहमीच भेट होत जाईल. चालेल का ?’

‘तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे. तुमच्या सुखासाठी मी सारे करीन.’

‘मग नाही का येत माझ्याबरोबर ?’

‘नको. एखाद्या तरुणावर, समजा, माझे प्रेम जडले आणि तो बुद्धीमान नसला तर ? त्याला मग थोडेच येथे राहाता येईल ? ते नकोच, तुम्ही ज्याच्याशी लग्न लावाल त्याच्याशी मी आनंदाने संसार करीन.’

‘हेमा मुलगी असावी तर तुझ्यासारखी. धन्य आहेस तू !’

असे म्हणून आदित्यनारायण निघून गेले.

« PreviousChapter ListNext »