Bookstruck

सचिंत शिरीष 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘करुणेचे पुढे काय झाले ?’

‘कोणाला माहीत !’

‘तिचे लग्न झाले ?’

‘म्हणतात, झाले म्हणून.’

‘शिरीष, तुला तिची काही माहिती नाही ?’

‘आज तरी नाही. इतकी वर्षे मी राजधानीत आहे. आता लहानपणाच्या गोष्टींची कोण करतो आठवण ? हेमा, ते पाहा सुंदर ढग.’

‘खरेच किती छान. एखादे वेळेस आकाशातील देखावे किती मनोहर दिसतात !’

‘आपल्याही जीवनात एखादे वेळेस केवढी उदात्तता प्रगट होते, नाही ?’

‘शिरीष, परंतु हे मनोरम देखावे काळ्या ढगांतून निर्माण झाले आहेत. भिंती खरवडल्या तर खाली क्षुद्र मातीच दिसते. वरुन झिलई, वरुन रंग, असे नाही ?’

‘असा नाही ह्याचा अर्थ, ह्याचा अर्थ असा की, जे क्षुद्र आहे तेही सुंदर होईल. जे घाणेरडे आहे तेही मंगल होईल. सौंदर्याचे व मांगल्याचे कोंब अणुरेणूत आहेत. प्रत्येक परमाणू परमसौंदर्याने नटलेला आहे. त्या परमेश्वराची कला कणाकणांत खच्चून भरलेली आहे. केव्हा ना केव्हा ती प्रगट होतेच होते.’

‘केव्हा होते प्रगट ?’

‘प्रभूची करुणा होते तेव्हा !’

‘शिरीष, प्रभूची करुणा तुझ्याकडे का नाही येत? तुला का नाही आनंदवीत ? तुझ्या रोमारोमांतून प्रसन्नता का नाही फुलवीत ? तुझ्या जीवनातील प्रभूची कला कधी फुलेल ? तू आनंदी कधी होशील ?’

‘लवकरच होईन. लवकरच प्रभूच्या करुणेचा अमृतस्पर्श होईल व माझे जीवन शतरंगांनी खुलेल.’

‘शिरीष, चल जाऊ. आकाशातील कला मावलू लागली. धर माझा हात. चल !’ हेमा म्हणाली.

दोघे मुकी मुकी घरी गेली.

« PreviousChapter ListNext »