Bookstruck

यात्रेकरीण 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी सकाळी करुणा त्या समाध्यांजवळ गेली होती. हात जोडून, डोळे मिटून ती तेथे बसली होती. मधून मधून तिच्या डोळ्यांतून अश्रू घळघळत होते. प्रेमानंद तेथे येऊन उभा होता. ते पवित्र व प्रेमळ, करुणगंभीर दृश्य तो पाहात होता. करुणेने डोळे उघडले, समोर प्रेमानंद होता. क्षणभर कोणी बोलले नाही.

‘प्रेमानंद, बसा. उभे का ? परके थोडेच आहात ? शिरीषचे तुम्ही मित्र. बसा. केव्हा येईल तुमचा मित्र ? असा कसा कठोर मित्र ?’

‘करुणाताई, तुम्हाला एक विचार सांगायला मी आज आलो आहे.’

‘सांगा. तुम्ही सांगाल ते कल्याणाचेच असेल.’

‘करुणाताई, तुम्ही शिरीषला भेटायला जा. शिरीष मुख्य प्रधान झाला आहे. जा त्याचा शोध करीत. राजधानीला जा. तुमच्यावर भूमातेची कृपा आहे. सारे गोड होईल असे मला वाटते. येथले तुमचे सारे कर्तव्य संपले आहे. आता पतिव्रतेचे खरे कर्तव्य हाती घ्या, पतीच्या शोधार्थ बाहेर पडा.’

‘त्या मोठ्या राजधानीत मी कशी जाऊ ? शिरीष प्रधान. मी खेडवळ. कशी तेथे जायला धजू ? ‘शिरीष’, म्हणून कशी हाक मारु ? शिरीष कोठे राहातो, म्हणून कोणाला कसे विचारु ? माझे नाते कसे सांगू ? सारी हसतील. वेडी आहे ही बाई असे म्हणतील आणि मुक्तापूर राजधानी किती दूर ? कशी पोचू ? वाटेत जंगले आहेत. मोठमोठ्या नद्या आहेत. कठीण आहे, प्रेमानंद.’

« PreviousChapter ListNext »