Bookstruck

जाई 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जाईने मोहनचा बाळ बरोबर घेतला व ती निघाली. प्रेमळ जाईचा बाळाला फार लळा लागला होता. प्रेम मुलांनाही समजते. रामजीच्या दृष्टीला बाळ पडेल अशी काहीतरी योजना करण्याचे जाईच्या मनात होते. ती शेतावर निघाली. ती एका बांधावर बाळाला घेऊन बसली. लहान झाडाची तेथे सावली होती. बाळ देखणा होता, मोहक होता. त्याला अधिक मनोहर व मोहक करण्यासाठी जाईने फुलांनी त्याला नटविले. तो बाळ जणू बाळकृष्णाचीच रमणीय मूर्ती आहे असे वाटत होते. जाई त्याच्याकडे पाही व पटकन् त्याला पोटाशी धरी, त्याला चुंबी. 'घेतील, बाबा ह्या बाळाला घेतील. त्यांच्या कुळातीलच हा मोत्याचा दाणा आहे. त्यांच्या वंशाचेच बीज. किती सुंदर दिसतो आहे! ह्याला कोण घेणार नाही? कोण कौतुक करणार नाही? कोण कुरवाळणार नाही? ह्या बाळाच्या पायाला बोचू नये म्हणून काटे बोथट होतील? दगडाची फुले होतील. मग बाबा का विरघळणार नाहीत? त्यांचे हृदयही बाळाला पाहून मऊ लोण्यासारखे होईल.' अशा आशेने जाई त्या बांधावर बसली होती.

कामकर्‍यांनी जाईला पाहिले परंतु रामजीला सांगण्याचे त्यांना धैर्य झाले नाही. म्हातार्‍याच्या राग त्यांना माहीत होता. जाई बस बस बसली. शेवटी सांजावले. कामकरी निघून गेले. सूर्य निघून गेला. देव मावळला व अंधार पडला. जाईचा आशासूर्यही मावळला व तिच्या हृदयात अंधार भरला.

दुसर्‍या दिवशी जाई पुन्हा त्या बाळाला घेऊन बांधावर बसली. कापणारे कापत होते. पक्षी गात होते. जाई बाळाला फुलांनी मढवीत होती. तो पाहा रामजी शेते पाहात येत आहे. जाईच्या मनात आशा जागी झाली. धावत जावे असे तिला वाटले; परंतु आला, रामजीच जवळ आला.

रामजीने रागाने जाईकडे पाहिले व तो म्हणाला, 'तू शेवटी त्या घरी गेलीस. तूही त्याच्यासारखीच मर. काढ उपास, कर उन्हात काम. तुमच्या नशीबीच नाही, त्याला कोण काय करणार? सुखाचा घास नाही तुमच्या दैवी. मरा सारी उपासमारीनं व मला म्हातार्‍याला मात्र खायला जिवंत ठेवा.'

« PreviousChapter ListNext »