Bookstruck

असमाधान 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- शिष्य नम्रपणे म्हणाला, ‘आज तुम्ही उपनिषदे माझ्याबरोबर वाचणार होतेत. चला वर. रागावू नका. तुमच्या ज्ञानसिंधुतील एक कण तरी मला मिळू दे.

गुरु-शिष्य वर आले; परंतु माधव काही बोलेना. शिष्य तसाच येथे पुस्तक उघडून बसला होता. बाहेर चांगला प्रकाश पडला. सूर्यनारायण वर आला. गावातील व्यवहार सुरू झाले. लोक हिंडू-फिरू लागले. आज बाजाराचा दिवस होता. खेडयापाडयांतील लोक गाडया घेऊन येत होते. भाजीपाल्याच्या, धान्याच्या, फळांच्या, उसाच्या गाडया येत होत्या.

‘आज बाहेर फिरायला जाऊ. येतोस? त्या टेकडीवर जाऊ. माधव म्हणाला.

‘मला घरी काम आहे. आज बाजाराचा दिवस -’ शिष्य म्हणाला.

‘जा तर घरी. आज मला फिरण्याची हुक्की आली आहे. आज नको वाचन. रोज आहेच वाचणे-’ माधव म्हणाला.

शिष्य निघून गेला- माधव दिवाणखान्यात हिंडत होता. तो पुन्हा विचारात मग्न झाला. त्याने एक कपाट उघडले. त्यातील एक कुपी त्याने घेतली व ती खिशात ठेवली. पुन्हा येरझारा सुरू झाल्या. एकदम काही तरी ठरले. लांब अंगरखा घालून माधव बाहेर पडला. तो झपाझप जात होता. किती तरी दिवसांनी तो आज बाहेर पडला होता. लोक त्याच्या पाया पडण्यासाठी धावले. एकच गर्दी झाली. लहान-मोठयांची, स्त्री-पुरुषांची झुंबड उडाली. माधव चिडला. तो संतापला.

‘कशाला माझ्या पाया पडता?’तो संतापून ओरडला

‘वा! असे कसे म्हणता महाराज! तुम्ही मागे औषध दिलेत त्याने माझा रोग गेला. देव आहात तुम्ही.’ एक मनुष्य म्हणाला.

‘अरे, तुझा रोग बरा झाला असेल तर दुसरे दहा माझे औषध घेऊन मेले असतील. तुम्ही माणसे मोठी विचित्र. नका रे त्रास देऊ.’तो पुन्हा दुसर्‍या लोकांस म्हणाला.

शेवटी माधव पळत सुटला. निसटला एकदाचा. लोक मागे राहिले.  बाजाराची गर्दी सुरू झाली. ते माधवला विसरले. माधव आता एकटाच जात होता. बाहेर ऊन होते; परंतु त्याला भान नव्हते. रात्री चंद्रप्रकाश त्याला आवडला; आता ऊन आवडत हाते. तहान भूक सारे तो विसरला. शेकडो विचार त्याच्या मनात येत होते. ते विचार त्याला कोठे तरी नेत होते.

समोर टेकडी होती. तो आता टेकडी चढू लागला. जरा घसरला, परंतु पुन्हा सावरला. दुप्पट जोराने चढून तो वर आला. तेथे एक प्रचंड शिळा होती. त्या शिळेवर तो बसला. किती तरी वेळ बसला. तिकडे बाजार संपत आला. गाडया परत चालल्या. सूर्यनारायणही अस्तास चालला. पश्चिमेकडे लाल-लाल झाले होते.

माधवाने खिशातील ती कुपी काढली. तिचे बूच त्याने काढले. ‘टाकू का पिऊन? काय करायचे जगून? काय मिळविले? सारे जीवन व्यर्थ आहे. मानवी जीवनात अर्थ नाही. पडू दे ही मातीत माती.’ असे तो म्हणत होता. पुन: पुन्हा ती कुपी तो तोंडाजवळ नेई; परंतु पुन्हा हात खाली येई. ‘छे! जगाला कंटाळून का मरू? निराशेने मरू? मी काय भ्याड आहे? दुनिया मला भेकड मानील. माधव भेकड नाही. माधव निराशेच्या आहारी जाणार नाही. माधव जगात कोणालाही शरण जाणार नाही. नकोत हे मरणाचे विचार - आत्महत्येचे दुबळे विचार.’ त्याने ती कुपी दूर भिरकावून दिली. त्याने मरण भिरकावले; पुन्हा जीवनाला मिठी मारायला तो उभा राहिला.

« PreviousChapter ListNext »