Bookstruck

सैतानाशी करार 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

निराशेला खोल दरीत भिरकावून माधव तेथे बसला होता. ‘अस्तास जातानाही सूर्य लाल आहे, मरतानाही झगडत आहे. मलाही झगडू दे -’ असे त्याच्या मनात आले. आता जरा अंधार पडला; परंतु थोडया वेळाने चंद्र वर आला. सुदर चांदणे पडले. माधव घरी जाण्यासाठी निघाला. इतक्यात त्याच्या पायाशी एक कुत्रे आले. कोठून ते आले? एकदम कसे आले?

ते कुत्रे साधे नव्हते. ते निराळे होते. माधव त्याच्याकडे निरखून पाहू लागला. ते कुत्रे बरोबर न्यावे असे त्याला वाटले. ‘कुर कुर, कुर कुर’ करीत तो त्या कुत्र्याला बोलावीत होता. कुत्रेही त्याच्या पाठोपाठ येत होते. ते कुत्रे वाटेत इकडे-तिकडे गेले नाही. त्याच्यावर गावातील कुत्री भुंकली नाहीत. मोठे चमत्कारिक कुत्रे.

माधव आपल्या दिवाणखान्यात आला. ते कुत्रेही दिवाणखान्यात आले. ते कोपर्‍यात बसले. माधवाने दार लावून घेतले. त्याने खिडकी बंद केली. त्याने तेलचूल पेटविली. ज्वाळा निघू लागल्या. माधव काही मंत्र पुटपुटू लागला. पिशाच्चविद्येतील ते मंत्र होते. त्या ज्वाळांतून एकदम कोणी बाहेर आले. माधवासमोर उभे राहिले.

‘कोण आहेस तू?’ माधवने प्रश्न केला.

‘मी जीवनाचा साक्षी. माणसाचे जन्म-मरण पाहातो. सुख दु:खाच्या लाटांवर तो कसा हेलकावे खातो ते मी पाहातो.’ ती व्यक्ती म्हणाली.

‘जीवनावर तुझी सत्ता आहे का? माणसाला पाहिजे ते देशील का? जी-जी इच्छा उत्पन्न होईल ती-ती तू पुरवशील का?’

‘मी अकर्ता आहे. मी केवळ साक्षी आहे. देणे-घेणे माझे काम नाही. दिवस-रात्र, सुख-दु:ख, जीवन-मरण हयांचा विराट खेळ मी पाहात असतो एवढेच माझे काम.’

‘तुझी मला जरूर नाही. कशाला आलास माझ्यासमोर? नीघ येथून. कर काळे!’ रागाने माधव म्हणाला.

« PreviousChapter ListNext »