Bookstruck

राज्याच्या दरबारात 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘किती दिवसांनी?’

‘चार दिवस थांबा.’

‘तोपर्यंत मी प्रचंड मंडप घालायला लावतो. त्या समारंभात सारे येऊ देत. क्षणभर मौज.

माधव गेला. त्याने सैतानाला ती गोष्ट सांगितली.

‘कसे काय हे करणार?’ सैतानाने विचारले.

‘ते मला माहीत की तुला? मी राजाला कबूल केले आहे. तू सारे शक्य केले पाहिजेस.’ माधव बेफिकिरपणे म्हणाला.

‘वाटेल ते तू कबूल करावेस व माझ्यावर जबाबदारी टाकावीस. तुम्ही माणसे म्हणजे विचित्र प्राणी.’

‘ते काही असो, कराराप्रमाणे वागा म्हणजे झाले. जास्त बोलण्याची जरूर नाही.’

‘तुला थोडे धाडस केले पाहिजे.,

‘करीन.’

‘उद्या मध्यरात्री येथून चार कोसांवर असलेल्या जंगलात जा. तेथे पिशाच्चांची वस्ती आहे. ती एकदम तुझ्या अंगावर धावतील; परंतु घाबरू नकोस. ‘सैतानाची शपथ’ असे म्हण. म्हणजे ती गोगलगायीप्रमाणे होतील. ती हात जोडून उभी राहातील. त्यांना राजाची इच्छा सांग, इच्छा पुरी करण्याचे साधन द्या, असे म्हण. जे देतील ते घेऊन ये.’

दुसर्‍या दिवशी मध्यरात्री माधव उठला. बाहेर कोल्हे ओरडत होते. अंधार होता. थंडी मी म्हणत होती; परंतु निर्भय माधव जात होता. त्या जंगलाजवळ तो आला. एकदम किंचाळया त्याच्या कानी आल्या. तो चपापला; परंतु पुन्हा पुढे चालला. पिशाच्चे त्याच्या अंगावर धावली. ‘सैतानाची शपथ’ असे तो म्हणाला. पिशाच्चे शांत झाली.

‘राजाला प्राचीन काळापासूनच्या सर्व सुंदर स्त्रिया बघण्याची इच्छा आहे. ती इच्छा पुरी करण्याचे मी कबूल केले आहे. ती इच्छा पुरी करण्याचे साधन द्या.’ माधवाने सांगितले.

« PreviousChapter ListNext »